

पणजी : गोव्यातील फिडे बुद्धिबळ विश्व करंडक स्पर्धेत दुसर्या फेरीतील पहिल्या डावात भारताचा विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशला कझाकिस्तानचा ग्रँडमास्टर काझीबेक नोगरबेक याच्याविरुद्ध बरोबरीला मान्यता द्यावी लागली. विशेष म्हणजे या लढतीत काझीबेक काळ्या मोहर्यांनी खेळत होता. विद्यमान विश्वजेत्याविरुद्ध अशी कामगिरी करणे क्वचितच एखाद्या खेळाडूला शक्य होते. अन्य लढतीत अॅरोनियन, वेई यांनी विजय संपादन केले.
अन्य एका लढतीत भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराथीला अर्जेंटिनाच्या 12 वर्षीय ओरो फॉस्टिनो या विलक्षण प्रतिभावान खेळाडूने दुसर्या फेरीच्या पहिल्या डावात त्याला बरोबरीत रोखत धक्कादायक निकालाची नोंद केली. या स्पर्धेतील दुसर्या डावाच्या प्रारंभी, राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पाचवेळचा विश्वविजेता, फिडे उपाध्यक्ष विश्वनाथन आनंदच्या खास हजेरीत गुकेशच्या पटावर पहिली औपचारिक चाल खेळून फेरीचे उद्घाटन केले. अव्वल मानांकित खेळाडू असलेल्या गुकेशला नशिबाची साथ मात्र मिळाली नाही.
खेळ सुरू होण्यापूर्वी आनंद आणि मुख्यमंत्री यांनी एका खचाखच भरलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार कोण, असे विचारले असता, आनंदने सावध पवित्रा घेतला. मात्र, ग्रँडमास्टर लेवॉन अरोनियन या स्पर्धेला अत्यंत गांभीर्याने घेत असल्याचे निरीक्षण त्याने यावेळी नोंदवले. याशिवाय, अमेरिकेचा स्टार खेळाडू हॅन्स मोक नीमन त्याच्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेत तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे त्याने नमूद केले.
मॅग्नस कार्लसन, हिकारू नाकामुरा, फॅबियानो कारुआना आणि अलीरेझा फिरोझा यांनी काही कारणास्तव या स्पर्धेतून माघार घेतली असली, तरी जगातील जवळजवळ सर्व अव्वल 100 खेळाडू येथे सह भागी झाले आहेत. ही खर्या अर्थाने बुद्धिबळातील दिग्गजांची मांदियाळी आहे आणि हे सर्व अनुभवण्याचे भाग्य मला लाभले आहे, याची मी जाणीव ठेवतो, असेही या जगज्जेत्याने शेवटी नमूद केले.