

पुढारी ऑनलाईन डेस्क : हाँ मॅटर बडे.. वहॉ विराट खडे..! ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर वीरेंद्र सेहवागने विराट कोहलीच्या कौतुकासाठी केलेले हे ट्विट रविवारी पुन्हा एकदा खरे ठरले. विश्वचषकात सलग चार सामने जिंकणार्या न्यूझीलंडविरुध्दच्या सामन्यात भारताचे धुरंधर एका बाजूने बाद होत असताना विराट कोहली पहाडासारखा दुसर्या बाजूला उभा राहिला. नुसता उभाच नाही राहिला तर त्याने राम लक्ष्णमाला खांद्यावर घेवून समुद्रलंघन करणार्या हनुमानाप्रमाणे संघाच्या विजयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर पेलली. भारताला विश्वचषकातील न्यूझीलंडवर 20 वर्षानंतर पहिला विजय मिळाला. दरम्यान भारताच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. (IND vs NZ)
पीएम मोदी म्हणाले, न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन! हा एक उत्कृष्ट सांघिक प्रयत्न होता जिथे प्रत्येकाने योगदान दिले. मैदानावरील समर्पण आणि कौशल्य अनुकरणीय होते.
डॅरेल मिचेलच्या तुफानी शतकानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यामुळे न्यूझीलंडला 50 षटकांत 273 धावांपर्यंतच मजल मारता आली. मोहम्मद शमीने आज मिळालेल्या संधीचे सोने केले आणि पाच विकेटस् घेत आपली निवड सार्थ ठरवली. न्यूझीलंडकडून डॅरेल मिचेलने 130 तर रचिन रवींद्रने 75 धावा केल्या. हे आव्हान भारताने 48 षटकांत 4 विकेटस आणि 12 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. विराट कोहलीने 95, रोहित शर्माने 46 धावा केल्या.
धर्मशाळाच्या सुंदर व्ह्यू असलेल्या मैदानावर न्यूझीलंडच्या 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने नेहमीच्या स्टाईलने आक्रमक सुरुवात केली. त्यांनी किवी गोलंदाजांच्या वेगाचा वापर करीत टायमिंगवर अचूक फटके मारत धावा गोळा केल्या. पॉवरप्लेमध्ये संघाच्या बिनबाद 63 धावा झाल्या होत्या. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री, मिशेल सँटनेर अपयशी ठरल्यानंतर ही जोडी फोडण्यासाठी कर्णधाराने लॉकी फर्ग्युसनच्या हाती चेंडू दिला. त्याने आपले काम चोख बजावले. आधी रोहितचा त्रिफळा उडवून फर्ग्युसनने गिलला थर्डमॅनच्या जाळ्यात अडकवले. रोहितने 46 तर गिलने 26 धावा केल्या.