

वॉशिंग्टन : कोल पामरच्या दोन गोलांच्या आणि एका असिस्टच्या जोरावर चेल्सीने क्लब वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनला (पीएसजी) 3-0 ने पराभूत करत सनसनाटी विजय नोंदवला. नुकतेच चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावलेल्या आणि उपांत्य फेरीत रियल माद्रिदचा 4-0 असा धुव्वा उडवलेल्या पीएसजीला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र, उपांत्य फेरीत सुरुवातीलाच तीन गोलांची आघाडी घेणार्या पीएसजी संघावर या अंतिम सामन्यात परिस्थिती पूर्णपणे उलटली आणि मध्यंतरापर्यंत संघ 3-0 ने पिछाडीवर पडला.
सामन्याच्या पूर्वार्धाच्या मध्यात पामरने गोल करत चेल्सीचे खाते उघडले. त्यानंतर 30 व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. 43 व्या मिनिटाला, पीएसजीच्या ढिसाळ बचावाचा फायदा घेत त्याने जाओ पेड्रोला तिसर्या गोलसाठी साहाय्य केले. सामना संपायला चार मिनिटे शिल्लक असताना, जाओ नेवेसला व्हीएआर रिव्ह्यूनंतर रेड कार्ड दाखवण्यात आले. चेंडू जवळ नसताना मार्क कुकुरेला ओढल्याबद्दल त्याला ही शिक्षा झाली.
हा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित होता. या विजयासह चेल्सीने आपल्या लांबलेल्या, पण अविस्मरणीय ठरलेल्या हंगामाचा शेवट केला. यूएफा कॉन्फरन्स लीग जिंकणार्या आणि प्रीमियर लीगमध्ये चौथे स्थान मिळवणार्या चेल्सीने 32 संघांच्या क्लब वर्ल्डकपचे पहिले विजेते होण्याचा मान मिळवला आहे. या विजयामुळे त्यांना बक्षीस म्हणून सुमारे 125 दशलक्ष डॉलर्सची रक्कमही मिळाली.
दुसरीकडे, पीएसजीलाही दुसर्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले असले तरी आर्थिक तरी, चॅम्पियन्स लीग आणि फ्रेंच लीग व कप या दुहेरी विजेतेपदांसोबत हे विजेतेपद जोडण्यात अपयशी ठरल्याने संघाला नक्कीच निराशा झाली असेल. असे असले तरी, लुईस एन्रिक यांच्या संघासाठी या हंगामातील मुख्य ध्येय युरोपियन विजेतेपद हेच होते. आता या पराभवावर विचार करण्यासाठी आणि आत्मचिंतनासाठी त्यांच्याकडे महिन्याभराचा कालावधी आहे, त्यानंतर ते यूएफा सुपर कपमध्ये टॉटनहॅम हॉटस्परविरुद्ध मैदानात उतरतील.
चेल्सीला चषक प्रदान करण्यापूर्वी, सामना संपल्यानंतर मैदानावर तणाव निर्माण झाला आणि खेळाडू एकमेकांना भिडले. यावेळी पॅरिसचे प्रशिक्षक लुईस एन्रिक हे जाओ पेड्रोच्या गळ्याला हात लावताना दिसले. यावर स्पष्टीकरण देताना लुईस एन्रिक म्हणाले, तिथे खूप धक्काबुक्की झाली. ही एक अशी परिस्थिती होती जी टाळायला हवी होती, पण माझा हेतू केवळ खेळाडूंना वेगळे करण्याचा होता.