

लखनौ : इम्पॅक्ट प्लेयर शिवम दुबेची 43 धावांची जलद खेळी आणि त्याला रचिन रवींद्र, धोनी, शेख रशीद यांची उत्तम साथ मिळाल्यानंतर चेन्नईने आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ला 5 गडी राखून पराभवाचा धक्का दिला. चेन्नईसाठी हा सलग 5 पराभवानंतरचा पहिलाच विजय ठरला. या विजयामुळे त्यांना सूर सापडल्याचे अधोरेखित झाले.
या लढतीत लखनौने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 बाद 166 धावा केल्या तर प्रत्युत्तरात चेन्नईने 19.3 षटकांत 5 बाद 168 धावांसह शानदार विजय संपादन केला. विजयासाठी 167 धावांचे आव्हान असताना शेख रशीद (27), रचिन रवींद्र (37) यांनी 4.5 षटकांतच 52 धावांचा फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिला. मधल्या फळीतील राहुल त्रिपाठी (9) व रवींद्र जडेजा (7) स्वस्तात बाद झाल्याने एकवेळ चेन्नईचा संघ 12.2 षटकांत 4 बाद 96 अशा स्थितीत होता. मात्र, दुबेने एक बाजू लावून धरली आणि अंतिमत: संघाला देदीप्यमान विजयही मिळवून दिला.
प्रारंभी, चेन्नईने नाणेफेक जिंकत लखनौला प्रथम फलंदाजीला पाचारण केले होते. लखनौतर्फे कर्णधार ऋषभ पंतने 49 चेंडूंत 63 धावा झळकावत लखनौच्या डावाला आकार देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्याच्या या शानदार अर्धशतकी खेळीत 4 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला. मात्र, लखनौच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला अजिबात सूर सापडला नाही. यामुळे त्यांच्या धावसंख्येवर बर्याच मर्यादा राहिल्या.
सातत्याने पराभवाच्या गर्तेत लोटल्या गेलेल्या चेन्नईने या लढतीत मोक्याच्या क्षणी शिवम दुबेला इम्पॅक्ट खेळाडू या नात्याने फलंदाजीत उतरवले आणि हाच त्यांचा मास्टरस्ट्रोक ठरला. दुबेने 37 चेंडूंत नाबाद 43 धावांची शानदार खेळी साकारत विजय खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला.
डावातील 17 व्या षटकात शार्दुलच्या दुसर्या चेंडूवर धोनीने स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावलेला एकहाती षटकार त्याच्या खेळीतील सर्वात लक्षवेधी फटका ठरला. शार्दूलच्या स्लोअर वनवर धोनीची एका हाताची ग्रीप सुटली. पण, यानंतरही त्याचा एकहाती फटकाही इतक्या ताकदीचा होता की, चेंडू सहजपणे सीमारेषेपार प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये भिरकावला गेला !
लखनौ सुपर जायंटस् : 20 षटकांत 7 बाद 166. (ऋषभ पंत 49 चेंडूंत 4 चौकार, 4 षटकारांसह 63, मिचेल मार्श 30, आयुष बदोनी 22. रवींद्र जडेजा, पथिराणा प्रत्येकी 2 बळी).
चेन्नई सुपर किंग्ज : 19.3 षटकांत 5 बाद 168. (शिवम दुबे 37 चेंडूंत नाबाद 43, रचिन रवींद्र 37, धोनी 11 चेंडूंत नाबाद 26, शेख रशीद 27. रवी बिश्नोई 2-18, अवेश, दिग्वेश राठी, मार्कराम प्रत्येकी 1 बळी).