SA VS NZ : न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, भारताविरुद्ध जेतेपदाची लढत
न्यूझीलंडचा द. आफ्रिकेवर विजय
न्यूझीलंडने द. आफ्रिकेचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली. रविवारी (9 मार्च) जेतेपदाच्या लढतीत त्यांची लढत भारताशी होणार आहे.
यान्सेन बाद
सातवी विकेट गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका अडचणीत आहे. यान्सेनची विकेट ग्लेन फिलिप्सने घेतली. यासह, न्यूझीलंडने अंतिम फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकले.
मुल्डर ब्रेसवेलचा बळी
मायकेल ब्रेसवेलने मुल्डरची विकेट घेतली. सीमारेषेवर रचिन रवींद्रने मुल्डरचा झेलबाद पकडला.
एडेन मार्क्रम बाद
रचिन रवींद्रने एडेन मार्क्रमला कॉट अँड बोल्द केले. यासह दक्षिण आफ्रिकेने पाचवी विकेट गमावली.
क्लासेन बाद
सँटनरने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला. त्याने हेनरिक क्लासेनला आपला बळी बनवले. तो तीन धावा करून बाद झाला.
व्हॅन डर ड्यूसेन बाद
मिचेल सँटनरने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. त्याने व्हॅन डर ड्यूसेनला आपला बळी बनवले. 66 चेंडूत 69 धावांची खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
बावुमा बाद
मिचेल सँटनरने टेम्बा बावुमाला बाद करत दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका दिला. बावुमा आणि ड्युसेन हे दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी करत होते पण सँटनरने ही भागीदारी संपुष्टात आणली. बावुमा आणि ड्युसेन यांच्यात 105 धावांची भागीदारी झाली. बावुमा 71 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 56 धावा काढून बाद झाला.
ड्युसेनचे अर्धशतक
टेम्बा बावुमानंतर व्हॅन डर ड्यूसेननेही अर्धशतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील 17 वे अर्धशतक आहे.
बावुमाचे अर्धशतक
न्यूझीलंडविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा धावसंख्या 100 च्या पुढे गेली आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने शानदार फलंदाजी करत 64 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. बावुमाने ड्युसेनसोबत 50+ धावांची भागीदारीही केली आहे. 20 षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 1 बाद 107 होती.
दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका
सलामीवीर रायन रिकलटनला बाद करून मॅट हेन्रीने दक्षिण आफ्रिकेला पहिले यश मिळवून दिले. 13 चेंडूत चार चौकारांसह 17 धावा काढून रिकलटन बाद झाला.
केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांच्या शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने द. आफ्रिकेसमोर विजयासाठी 363 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेतील हे सर्वोच्च लक्ष्य आहे. जर दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना नवा इतिहास रचावा लागेल आणि सर्व जुने विक्रम मोडावे लागतील. टॉस जिंकून जिंकून प्रथम फलंदाजी केल्यानंतर न्यूझीलंडने 50 षटकांत सहा गडी गमावून 362 धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने विल यंगची विकेट लवकर गमावली. तो 21 धावा करून बाद झाला. तथापि, यानंतर रचिन रविंद्र आणि केन विल्यमसन यांनी शानदार भागीदारी केली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 164 धावांची भागीदारी झाली.
यादरम्यान, रचिनने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतकही झळकावले. शतक ठोकल्यानंतर रचिन बाद झाला. त्याने 101 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 108 धावा केल्या. यानंतर, विल्यमसनने डाव पुढे नेला. त्यानेही त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 15 वे शतक पूर्ण केले. विल्यमसन 94 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 102 धावा काढल्यानंतर बाद झाला.
डॅरिल मिशेलचे अर्धशतक हुकले
डॅरिल मिशेलचे अर्धशतक हुकले. तो 49 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मिचेल आणि ग्लेन फिलिप्स चांगली भागीदारी करत होते, परंतु लुंगी एनगिडीने मिचेलला बाद करून ती भागीदारी मोडली.
न्यूझीलंडने पूर्ण केला ३०० धावांचा टप्पा
45.3 षटकांमध्ये न्यूझीलंडने ४ गडी गमावत ३०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
रबाडाने टॉम लॅथमला केले आऊट
टॉम लॅथमला बाद करून कागिसो रबाडाने न्यूझीलंडला चौथा धक्का दिला आहे.
केन विल्यमसन शतकी खेळीनंतर बाद
विल्यमसन शतक पूर्ण केल्यानंतर बाद झाला. मुल्डरच्या चेंडूवर शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना तो झेलबाद झाला. न्यूझीलंड संघाने २५० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
विल्यमसनचे शतक
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने 91 चेंडूत शतक झळकावले. ही त्याची वनडेतील 15 वी शतकी खेळी आहे.
रचिन रवींद्र बाद
रचिन रवींद्रला बाद करून कागिसो रबाडाने न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला आहे. रचिन शानदार फलंदाजी करत होता. त्याने पाचवे एकदिवसीय शतक झळकावले, पण रबाडाने रचिनचा डाव संपवला. यष्टीरक्षक क्लासेनने झेल पकडला. रचिन 101 चेंडूत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 108 धावा काढल्यानंतर बाद झाला.
रचिनचे शतक
रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे. त्याचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील पाचवे शतक आहे. त्याने 93 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील रचिनचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी, त्याने बांगलादेशविरुद्धच्या गट फेरीच्या सामन्यातही शतक झळकावले होते. न्यूझीलंडची धावसंख्या 32 षटकांनंतर एका विकेटच्या मोबदल्यात 201 वर पोहोचली.
विल्यमसनचे अर्धशतक
रचिन रवींद्रनंतर केन विल्यमसननेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात अर्धशतक झळकावले. विल्यमसन दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी देखील पूर्ण केली. 28 षटकांनंतर न्यूझीलंडचा स्कोअर एका विकेटच्या मोबदल्यात 169 होता.
रचिन-विल्यमसनची उत्तम भागीदारी
रचिन रवींद्र आणि केन विल्यमसन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपली शानदार फलंदाजी सुरू ठेवत न्यूझीलंडला 25 षटकांत 1 बाद 143 धावांपर्यंत पोहोचवले. यादरम्यान रचिन आणि विल्यमसन यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 90+ धावांची भागीदारी झाली.
रचिनचे अर्धशतक
न्यूझीलंडचा सलामीवीर रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याच्या शानदार फलंदाजीमुळे न्यूझीलंडचा धावसंख्या 100 च्या पुढे गेली.
विल यंग बाद! न्यूझीलंडला पहिला धक्का
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडला पहिला धक्का बसला आहे. विल यंग केवळ 21 धावांवर बाद झाला. लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर एडन मार्करमने त्याचा झेल घेतला. न्यूझीलंडची स्थिती 7.5 षटकांत 48/1 अशी झाली आहे.
न्यूझीलंडची सावध सुरुवात
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने स्थिर सुरुवात केली. सहा षटकांच्या शेवटी, न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता ५० धावा केल्या आहे. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी न्यूझीलंडला चांगली सुरुवात करून दिली आहे. रचिन नाबाद तर यंग नाबाद
न्यूझीलंडचा डाव सुरू
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा डाव सुरू झाला आहे. न्यूझीलंडकडून, विल यंग रचिन रवींद्रसह डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाचे प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरर्के
पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील रोमांचक सामना आज (५ मार्च) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना पाकिस्तानमधील लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघ सज्ज असून, अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांची कामगिरी आणि त्यांच्या खेळाडूंची फॉर्म लक्षात घेता, हा सामना अत्यंत अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना एक पर्वणी ठरणार आहे.
SA VS NZ Live Match | दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हेड टू हेड सामने
दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी आतापर्यंत ७३ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळले आहेत. त्यापैकी ४२ एकदिवसीय सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत तर २६ सामने किवींनी जिंकले आहेत. पाच सामन्यांचा निकाल लागला नाही. गेल्या पाच सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, या दोन्ही संघांनी २ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी एक जिंकला आहे. शेवटचा सामना फेब्रुवारी २०२५ मध्ये झाला होता. ब्लॅक कॅप्सने ३०४ धावांचा पाठलाग केला आणि ६ विकेटने विजय मिळवला.

