

बेंगळुरू; वृत्तसंस्था : दक्षिण विभागाच्या अंकित शर्मा आणि आंद्रे सिद्धार्थ यांनी बचावात्मक फलंदाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन केल्यानंतरही मध्य विभागाचा संघ 11 वर्षांनंतर आपले पहिले दुलिप करंडक विजेतेपद पटकावण्याच्या समीप पोहोचला आहे.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विजयासाठी मध्य विभागाला केवळ 65 धावांची गरज होती. रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी, दोन बाद 129 धावांवरून पुढे खेळताना, दक्षिण विभागाने पहिल्या सत्रात संघर्ष केला. मात्र, अखेर त्यांचा दुसरा डाव 426 धावांवर संपुष्टात आला. फिरकीपटू कुमार कार्तिकेय आणि सारांश जैन यांनी एकत्रित सात बळी घेतले. दक्षिण विभागाने मध्य विभागाला केवळ 64 धावांची नाममात्र आघाडी दिली, त्यामुळे सोमवारच्या पाचव्या दिवशी सेंट्रल झोन सहज हे लक्ष्य गाठेल, अशी अपेक्षा आहे.
दिवसभरातील खेळात अंकित (168 चेंडूंत 99) आणि सिद्धार्थ (190 चेंडूंत नाबाद 84) यांनी सातव्या विकेटसाठी 192 धावांची प्रभावी भागीदारी केली. या भागीदारीमुळे दक्षिण विभागाला 6 बाद 222 या धावसंख्येवरून मोठी झेप घेता आली. मध्य विभागाचे वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन यांनी ऑफ-स्टम्पच्या दिशेने भेदक चेंडू टाकून त्याला वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण विभाग पहिला डाव : 149. दुसरा डाव : 426 (अंकित शर्मा 99, सिद्धार्थ नाबाद 84).
मध्य विभाग पहिला डाव : 511 धावा.