US Open 2025 | अल्कारेझ, जोकोव्हिचची आगेकूच

दोन्ही दिग्गज उपांत्य सामन्यात आमने-सामने भिडण्याची शक्यता
carlos-alcaraz-novak-djokovic-reach-us-open-quarterfinals
US Open 2025 | अल्कारेझ, जोकोव्हिचची आगेकूचPudhari File Photo
Published on
Updated on

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : कार्लोस अल्कारेझ, नोव्हाक जोकोव्हिच यांनी अमेरिकन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला, तर महिलांमध्ये गतविजेत्या आर्यना सबालेंकाने आपले विजेतेपद राखण्याच्या दिशेने दमदार वाटचाल कायम ठेवली आहे. पुरुष एकेरीत स्पेनचा दुसरा मानांकित अल्कारेझ आणि टेनिस जगताचा आयकॉन जोकोव्हिच आता उपांत्य फेरीत आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

पाच वेळचा ग्रँडस्लॅम विजेता अल्कारेझने फ्रान्सच्या आर्थर रिंडरक्नेचवर 7-6 (7/3), 6-3, 6-4 असा विजय मिळवला आणि त्याने या स्पर्धेत अद्याप एकही सेट गमावलेला नाही. उपांत्यपूर्व फेरीत मंगळवारी अल्कारेझचा सामना झेक प्रजासत्ताकच्या 20 व्या मानांकित जिरी लेहेच्काशी होईल.

लेहेच्काने अनुभवी फ्रेंच खेळाडू एड्रियन मानारिनोवर 7-6 (7/4), 6-4, 2-6, 6-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसर्‍यांदा ग्रँडस्लॅमच्या अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. 38 वर्षीय जोकोव्हिचने विक्रमी 25 व्या ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदाच्या दिशेने आपली वाटचाल कायम ठेवताना, जर्मनीच्या बिगर मानांकित यान-लेनार्ड स्ट्रफचा 6-3, 6-3, 6-2 असा सहज पराभव केला. मंगळवारी होणार्‍या उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिचचा सामना स्पर्धेत टिकून असलेल्या एकमेव अमेरिकन पुरुष खेळाडू, चौथ्या मानांकित टेलर फ्रिट्झशी होईल.

अन्य लढतीत फ्रिट्झने झेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचाचचा 1 तास 38 मिनिटांत 6-4, 6-3, 6-3 असा पराभव करून अंतिम आठमध्ये धडक मारली. बेन शेल्टन, टॉमी पॉल आणि फ्रान्सिस टियाफो यांसारख्या मानांकित खेळाडूंच्या पराभवानंतर, 2003 मध्ये अँडी रॉडिकनंतर पहिला अमेरिकन पुरुष ग्रँड स्लॅम विजेता बनण्याची आशा आता फ्रिट्झवर आहे. मात्र, जोकोव्हिचविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रिट्झला मोठे आव्हान पार करावे लागणार आहे.

महिला एकेरीत सबालेंकाची घोडदौड कायम

महिला एकेरीत, सबालेंकाला जागतिक क्रमवारीत 95 व्या स्थानी असलेल्या स्पॅनिश खेळाडू क्रिस्टिना बुक्साचा 6-1, 6-4 असा पराभव करताना फारसा संघर्ष करावा लागला नाही. सबालेंकाने आता सलग 12 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये उपांत्यपूर्व फेरी किंवा त्यापुढे मजल मारली आहे.

उपांत्यपूर्व फेरीत सबालेंकाचा सामना झेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंद्रोसोवाशी होईल. 2023 च्या विम्बल्डन विजेत्या वोंद्रोसोवाने आर्थर अ‍ॅशवर झालेल्या शेवटच्या सामन्यात नवव्या मानांकित एलेना रायबाकिनाचा 6-4, 5-7, 6-2 असा धक्कादायक पराभव केला.

झेक प्रजासत्ताकच्या बिगर मानांकित, माजी फ्रेंच ओपन व विम्बल्डन विजेत्या बार्बोरा क्रेजिकोव्हाने तब्बल आठ मॅच पॉईंटस् वाचवून 1-6, 7-6 (15/13), 6-3 अशा फरकाने टेलर टाऊनसेंडला पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत क्रेजिकोव्हाचा सामना अमेरिकेच्या चौथ्या मानांकित जेसिका पेगुलाशी होईल. गतवर्षी अंतिम फेरीत पराभूत झालेल्या पेगुलाने आर्थर अ‍ॅश स्टेडियम कोर्टवर आपल्याच देशाच्या न लीचा 6-1, 6-2 असा सहज पराभव करून अंतिम आठमध्ये प्रवेश केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news