नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ट्विट करुन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने योग्य संघाचा प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियात नुकत्याच लागलेल्या भीषण आगीत होरपळलेल्यांना मदतीचा हात देण्यासाठी बुशफायर क्रिकेट बॅश स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. यातील एका संघाचा प्रशिक्षक होण्याचा निर्णय सचिन तेंडुलकरने घेतला आहे. तर कर्टनी वॉल्श दुसऱ्या संघाचे प्रशिक्षक होणार आहेत.
ऑस्ट्रेलियातील आग पीडितांना मदत करण्यासठी ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सरसावले आहेत. बुशफायर क्रिकेट बॅश स्पर्धेत पॉटिंग इलेव्हन आणि वॉर्न इलेव्हन संघ सहभागी होणार आहेत. यात पॉटिंग इलेव्हन संघाचा प्रशिक्षक सचिन तेंडुलकर असणार आहे तर वॉर्न इलेव्हनचे प्रशिक्षक कर्टनी वॉल्श असणार आहेत. याबाबत पॉटिंगने 'सचिन तेंडुलकर बुशफायर बॅशचा भाग आणि या चांगल्या कार्यासाठी आपला वेळ देणार ही चांगली बाब आहे. याचबरोबर च्याने योग्य संघाचे प्रशिक्षक होण्याचा निर्णय घेतला आहे.' असे ट्विट करत सचिनचे एकप्रकारे स्वागतच केले आहे.
बुशफायर बॅशचा सामना ८ फेब्रुवारीला होणार आहे. या सामन्यात जमा होणारी रक्कम रेड क्रॉस आपत्ती पुनर्वसन फंडाला देण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ केविन रॉबर्ट्स यांनी सचिन आणि वॉल्शचे स्वागत असल्याचे सांगितले. या सामन्यात रिकी पॉटिंग, शेन वॉर्न, जस्टीन लँगर, अॅडम गिलख्रिस्ट, ब्रेट ली, शेन वॉट्सन, अॅलेक्स ब्लॅकवेल आणि मायकल क्लार्क यासारखे नामांकित खेळाडू खेळणार आहेत.