

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेटसाठी 2025 हे वर्ष एका युगाच्या अंताचे साक्षी ठरले. आर. अश्विन, विराट कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या निवृत्तीच्या घोषणेनंतर चाहत्यांच्या मनात एक प्रश्न साहजिकच निर्माण होतो की, देशासाठी आपले सर्वस्व अर्पण करणार्या या खेळाडूंच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचे काय? याचे उत्तर बीसीसीआयच्या एका महत्त्वपूर्ण योजनेत दडले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या निवृत्त खेळाडूंच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी एक व्यापक पेन्शन योजना राबवते. ही योजना केवळ खेळाडूंना आर्थिक स्थैर्य देत नाही, तर त्यांच्या योगदानाचा सन्मानही करते. देशासाठी घाम गाळल्यानंतर निवृत्तीच्या काळात खेळाडूंना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. ही योजना केवळ आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटूंपुरती मर्यादित नाही. ज्या खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंनाही याचा लाभ मिळतो. विशेष म्हणजे, या योजनेत महिला क्रिकेटपटू आणि काही निवृत्त पंचांचाही समावेश आहे.
बीसीसीआयची ही पेन्शन योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नसून, देशासाठी योगदान दिलेल्या खेळाडूंच्या प्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्कम दरवर्षी वाढवली जात नसली तरी, खेळाडूंच्या गरजा आणि आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात वेळोवेळी महत्त्वपूर्ण वाढ केली जाते, जेणेकरून निवृत्तीनंतरही खेळाडूंना सन्मानजनक जीवन जगता यावे.
बीसीसीआयने खेळाडूंच्या योगदानाचा आणि वाढत्या महागाईचा विचार करून पेन्शनच्या रकमेत वेळोवेळी वाढ केली आहे. सध्याच्या नियमांनुसार खालीलप्रमाणे पेन्शन दिली जाते :
कसोटीपटू : ज्या खेळाडूंनी भारतासाठी कसोटी सामने खेळले आहेत, त्यांना दरमहा 60,000 पेन्शन मिळते. (पूर्वी ही रक्कम 37,500 होती)
वरिष्ठ खेळाडू : अत्यंत वरिष्ठ आणि जुन्या खेळाडूंसाठी असलेली पेन्शनची रक्कम वाढवून 70,000 प्रतिमहिना करण्यात आली आहे. (पूर्वी ही रक्कम 50,000 होती).
प्रथम श्रेणी क्रिकेटपटू : ज्यांनी 25 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने खेळलेल्यांना पूर्वीच्या 15,000 ऐवजी आता 30,000 रुपये दरमहा पेन्शन दिली जाते.