

नवी दिल्ली; वृत्तसेवा : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रायोजक पदावरून ड्रीम 11 बाहेर पडल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजकत्व दर वाढवले आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेल्या ‘ऑनलाईन गेमिंग कायदा 2025’ मुळे ड्रीम 11 ने त्यांचा ‘बीसीसीआय’शी असणारा करार संपुष्टात आणला होता. आता प्रायोजकत्वाच्या नव्या दरानुसार ‘बीसीसीआय’ द्विपक्षीय मालिकांसाठी प्रती सामना 3.5 कोटी रुपये आकारेल. तर बहुपक्षीय स्पर्धांसाठी प्रती सामना 1.5 कोटी रुपये आकारेल.
हे नवीन दर सध्याच्या दरांपेक्षा जास्त आहेत. पूर्वी द्विपक्षीय सामन्यांसाठी 3.17 कोटी रुपये आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी 1.12 कोटी रुपये आकारले जात होते. या वाढीमुळे ‘बीसीसीआय’ला द्विपक्षीय सामन्यांसाठी 10 टक्के आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी 3 टक्के अधिक उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.
द्विपक्षीय सामन्यांमध्ये प्रायोजकाचे नाव खेळाडूंच्या जर्सीवर समोर, छातीवर ठळकपणे दिसते, तर ‘आयसीसी’ आणि ‘एसीसी’च्या स्पर्धांमध्ये ते फक्त जर्सीच्या बाहीवर असते, ज्यामुळे ब्रँडला कमी प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ‘बीसीसीआय’ने दोन्ही प्रकारच्या सामन्यांसाठी वेगवेगळे दर ठेवले आहेत.
‘बीसीसीआय’ने पुढील तीन वर्षांसाठी प्रायोजकाचा शोध सुरू केला आहे. या कालावधीत 2026 चा टी-20 विश्वचषक आणि 2027 चा एकदिवसीय विश्वचषक अशा सुमारे 130 सामन्यांचा समावेश आहे. नवीन दरांनुसार, ‘बीसीसीआय’ला यातून 400 कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम बोली यापेक्षा जास्त असू शकते.
‘बीसीसीआय’ने ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ (इओआय) जारी केले असून, त्यात बोली लावणार्या कंपन्यांसाठी कडक नियम ठेवले आहेत. यामध्ये ऑनलाईन गेमिंग, सट्टेबाजी, क्रिप्टोकरन्सी आणि तंबाखूशी संबंधित कंपन्यांना बोली लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, अर्ज करणार्या कंपनीची मागील तीन वर्षांची सरासरी उलाढाल किंवा निव्वळ संपत्ती (नेट वर्थ) किमान 300 कोटी रुपये असणे अनिवार्य आहे.
नवीन प्रायोजक मिळवण्यासाठी 16 सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्यामुळे, 9 सप्टेंबरपासून सुरू होणार्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ जर्सीवर कोणताही प्रायोजक लोगो नसताना मैदानात उतरेल.
‘बीसीसीआय’ने 3 दिवसांपूर्वी मंगळवार, 2 सप्टेंबर रोजी जर्सी प्रायोजकत्वासाठी निविदा जारी केल्या होत्या. त्यानुसार, अल्कोहोल, तंबाखू, सट्टेबाजी, रिअल मनी गेमिंग (फँटसी स्पोर्ट्स गेमिंग वगळता), क्रिप्टोकरन्सी आणि पोर्नोग्राफीशी संबंधित ब्रँड किंवा सार्वजनिक नैतिकतेला धक्का पोहोचवणार्या कंपन्यांचा या बोलीत समावेश केला जाणार नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे. निविदा भरण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर आहे.
ड्रीम इलेव्हन ही एक ऑनलाईन फँटसी स्पोर्टिंग अॅप आहे, जिथे खेळणारी व्यक्ती क्रिकेटसारख्या खेळांमधील खेळाडूंची एक आभासी टीम तयार करून वास्तविक सामन्यांच्या कामगिरीवर आधारित गुण मिळवते. ड्रीम11 टीम तयार करणे म्हणजे, एका विशिष्ट सामन्यासाठी खेळाडू निवडून संघ तयार करणे आणि त्या संघाच्या गुणसंख्येनुसार बक्षिसे जिंकणे. टीम तयार करण्यासाठी, ड्रीम11 अॅप डाउनलोड करून, सामन्यांची निवड करून, संघ तयार करावा लागतो आणि त्यासाठी प्रवेश शुल्क भरावे लागते. यावर आता केंद्र सरकारने बंदी घातल्याने ड्रीम इलेव्हनने बीसीसीआयबरोबरचा मुख्य प्रायोजकत्वाचा करार संपुष्टात आणला आहे.