

बार्सिलोना (स्पेन); वृत्तसंस्था : स्पॅनिश फुटबॉलमधील सर्वात मोठी लढत असलेल्या ‘एल क्लासिको’मध्ये बार्सिलोनाने कट्टर प्रतिस्पर्धी रियल माद्रिदचा 2-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह बार्सिलोनाने दिमाखात 2025-26 च्या ला-लीगा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मार्कस रॅशफोर्ड आणि फेरान टोरेस यांच्या निर्णायक गोल्सच्या जोरावर ‘स्पोटिफाय कॅम्प नोऊ’ स्टेडियमवर बार्सिलोनाने 96 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रियल माद्रिदविरुद्धचा सामना जिंकून विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम गाजवला.
विजयाचा थरार
वितेजेपदासाठी बार्सिलोनाला केवळ एका गुणाची गरज होती आणि ही बाब नजरेसमोर ठेवत त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. 9 व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडचा माजी स्टार आणि सध्या लोनवर खेळणार्या मार्कस रॅशफोर्डने एका अप्रतिम फ्री-किकवर बार्सिलोनाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 18 व्या मिनिटाला फेरान टोरेसने गोल करत संघाची आघाडी 2-0 केली. या विजयानंतर बार्सिलोनाने माद्रिदवर 14 गुणांची आघाडी घेतली.
रियल माद्रिदची निराशा
रियल माद्रिदसाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. ज्युड बेलिंगहॅमचा एक गोल ऑफसाईड ठरल्यामुळे रद्द करण्यात आला, तर थिबॉत कोर्टोआने काही महत्त्वाचे बचाव केले, तरीही माद्रिदला पराभव टाळता आला नाही.
वडिलांचे निधन, तरीही दुसर्या दिवशी डगआऊटमध्ये!
प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोनाने सलग दुसर्यांदा ला-लीगा चषक जिंकला आहे. 2018-19 मध्ये अर्नेस्टो वाल्व्हर्डे यांच्यानंतर सलग दोन जेतेपदे मिळवणारे ते पहिले प्रशिक्षक ठरले. विशेष म्हणजे, सामन्याच्या आदल्याच दिवशी वडिलांचे निधन होऊनही फ्लिक यांनी डगआऊटमध्ये हजर राहून संघाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्रेरणेनेच संघही विजयरथावर आरुढ झाला.