

पुढारी ऑनलाईन डेस्क : सामना खेळत असताना बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बाल (Tamim Iqbal) याला आज (दि.२४) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. इक्बाल ढाका प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लबकडून खेळत होता. यावेळी क्षेत्ररक्षण करताना त्याला अस्वस्थ वाटू लागले, छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने केली. त्यानंतर त्याला फजिलातुनेशा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सविस्तर वैद्यकीय अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) डॉक्टर देबाशिष चौधरी यांनी सांगितले की, सुरुवातीला इक्बालची स्थानिक रुग्णालयात तपासणी करण्यात आली. जिथे सौम्य हृदयविकाराचा त्रास असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याला ढाक्याला नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हेलिपॅडकडे जाताना त्याच्या छातीत तीव्र वेदना झाल्या आणि त्याला परत घेऊन जावे लागले. नंतर वैद्यकीय अहवालात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निश्चित झाले. सध्या तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. वैद्यकीय पथक त्याच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत.
७० कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, तमीम इक्बालने २४३ एकदिवसीय आणि ७८ टी-२० सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले. कसोटी स्वरूपात, तमिम इक्बालने ३८.८९ च्या सरासरीने ५१३४ धावा केल्या. याशिवाय, त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत ३६.६५ च्या सरासरीने ८३५७ धावा केल्या. त्याने बांगलादेशसाठी टी-२० स्वरूपात ११७.२० च्या स्ट्राईक रेटने आणि २४.०८ च्या सरासरीने १७५८ धावा केल्या. तमीम इक्बालने एकदिवसीय सामन्यांमध्ये १० शतके केली. याशिवाय, तमीम इक्बालच्या नावावर कसोटी स्वरूपात १४ शतके आहेत. तर या फलंदाजाने टी-२० स्वरूपात एकदा शतकाचा टप्पा ओलांडला.
दरम्यान, आज ढाका प्रीमियर लीगमध्ये मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब हे संघ आमनेसामने होते. यादरम्यान तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका आला आहे.