पुढारी ऑनलाईन डेस्क : सातत्याने पराभवाला सामोरे जाणार्या पाकिस्तान क्रिकेटची अवस्था आणखी गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संघाचा स्टार फलंदाज बाबर आझम (Babar Azam) याने पुन्हा एकदा कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. १ ऑक्टोबर) रात्री उशिरा त्याने त्याच्या X हँडलद्वारे T20 आणि ODI संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. तसेच यामागील कारणही स्पष्ट केले आहे.
बाबर आझम आपल्या X पोस्टमध्ये लिहतो की, "गेल्या महिन्यात पीसीबी आणि संघ व्यवस्थापनाला दिलेल्या माहितीनुसार मी पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे, परंतु आता माझ्यावर पद सोडण्याची आणि माझ्या खेळण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कर्णधारपद हा मोठा अनुभव आहे; पण त्यामुळे कामाचा ताणही वाढला आहे. मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आहे, माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर मला माझ्या खेळावर आणि वैयक्तिक विकासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईरू. तुमच्या अतूट पाठिंब्याबद्दल आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. एक खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देण्यास मी उत्सुक आहे. तुमच्या प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद."
बाबर आझम याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील वर्षी भारतात आयोजित करण्यात आलेल्या वन-डे विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाला विशेष कामगिरी करता आली नाही. यानंतर बाबरने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. यानंतर टी-20 संघाची कमान शाहीन आफ्रिदीकडे सोपवण्यात आली, मात्र एका मालिकेनंतर (पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड) पीसीबीने पुन्हा एकदा बाबरकडे जबाबदारी सोपवली होती.
नोव्हेंबर २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानने एकही वनडे खेळलेला नाही. त्याच वेळी, अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदानंतर एकही टी-20 मालिका खेळली गेली नाही. बाबरनंतर आता वन-डेचा कर्णधार कोण होणार, या प्रश्नाचे उत्तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डला शोधावे लागणार आहे. कसोटीसाठी बाबरनंतर शान मसूदकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, आजपर्यंत तो कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध करू शकलेला नाही. अलीकडेच बांगलादेशने कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाला 0-2 अशा नामुष्कीजनक मालिका पराभवाला सामोरे जावे लागले होते.