

जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्सचा (RR vs LSG) अजून एक सामना अखेरच्या चेंडूपर्यंत पोहोचला आणि लखनौ सुपर जायंटस् संघाने 2 धावांनी दणदणीत विजय मिळवला. राजस्थानला अखेरच्या षटकात 9 धावांची गरज होती, पण आवेश खानच्या यॉर्करसमोर राजस्थानचे फलंदाज अपयशी ठरले. संपूर्ण सामन्यात राजस्थानचा संघ सामन्यात पुढे होता, पण अखेरच्या तीन षटकांमध्ये संपूर्ण सामना फिरला. आवेश खान या विजयाचा हीरो ठरला. त्याने 18 व्या षटकांत फक्त 5 धावा देताना यशस्वी जैस्वाल (75) आणि रियान पराग (39) यांना बाद केले, तर 20 व्या षटकांत शिमरोम हेटमायरला बाद करीत 9 धावांचा यशस्वी बचाव केला. (RR vs LSG)
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ने प्रथम फलंदाजी करताना 180 धावा केल्या. सलामीवीर एडन मार्कराम आणि मधल्या फळीतील फलंदाज आयुष बदोनी यांनी दमदार अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरादाखल, राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने शानदार अर्धशतक झळकावले, तर 14 वर्षीय वैभवने पदार्पण करत असताना, त्यानेही शानदार फलंदाजी केली, पण पुन्हा एकदा राजस्थानचे फिनिशर संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या लखनौ सुपर जायंटस् संघाने 5 बाद 180 धावांचा डोंगर उभा केला. एडन मार्कराम (66) व आयुष बदोनी (50) यांनी 76 धावांची भागीदारी करून सामन्यात रंगत आणली होती. पण, राजस्थानच्या गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. 20 व्या षटकात संदीप शर्माच्या गोलंदाजीवर अब्दुल समदने चार खणखणीत षटकार खेचले. त्याने 10 चेंडूंत नाबाद 30 धावा चोपल्या.
आयपीएल इतिहासातील सर्वात युवा पदार्पणवीर वैभवने (14 वर्ष व 23 दिवस) सलामीवीर यशस्वी जैस्वालसह दमदार सुरुवात केली. शार्दूल ठाकूरचा पहिलाच चेंडू वैभवने सीमापार पाठवला. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार खेचणारा तो चौथा भारतीय ठरला. एकंदर 9 खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे. नवव्या षटकात एडन मार्करामने ही जोडी तोडली. वैभव 20 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह 34 धावांवर झेलबाद झाला. बाद झाल्यावर तो भावनिक झाला आणि डोळे पुसत तो मैदानाबाहेर गेला.
त्याने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी 85 धावा जोडल्या. नितीश राणाला (8) शार्दूलने स्वस्तात बाद करून राजस्थानला दुसरा धक्का दिला. यशस्वीने 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करून राजस्थानला विजयपथावर ठेवले होते. त्याला आजचा कर्णधार रियान परागची साथ मिळाली आणि दोघांनी 62 धावा जोडल्या. यशस्वी 52 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 74 धावांवर बाद झाला. तेव्हा राजस्थानला विजयासाठी 25 धावा करायच्या होत्या.
18 व्या षटकाच्या पहिल्या व शेवटच्या चेंडूवर आवेश खानने अनुक्रमे यशस्वी व रियान यांना बाद केले. रियान 26 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारासह 39 धावांवर पायचीत झाला. रियान बाद झाला तेव्हा राजस्थानला 12 चेंडूंत 20 धावा हव्या होत्या आणि शिमरोन हेटमारयने 11 धावा घेत 6 चेंडू 9 धावा असा सामना जवळ आणला. 5 चेंडू शिल्लक असताना अम्पायरने चेंडू बदलण्याचा निर्णय घेतला. दुसर्या चेंडूवर दोन धावा आल्यानंतर आवेश खानने पुढील चेंडूवर हेटमायरला (12) माघारी पाठवले. आता 3 चेंडूंत 6 धावा असा सामना अटीतटीचा झाला. चौथा चेंडू निर्धाव राहिला. पाचव्या चेंडूवर झेल सुटल्याने दोन धावा घेता आल्या आणि शेवटच्या पण निर्णायक चेंडूवर एकच धाव निघाली. त्यामुळे अटीतटीच्या सामन्यात लखनौने 2 धावांनी विजय मिळवला.