

विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : ॲलिसा हिलीचे तडफदार शतक आणि तिला फोएबे लिचफिल्डने दिलेल्या दमदार साथीच्या बळावर ऑस्ट्रेलियन महिला संघाने आयसीसी वन डे विश्वचषक साखळी सामन्यात बांगला देशचा 10 गडी राखून एकतर्फी धुव्वा उडवला. बांगला देशने या लढतीत निर्धारित 50 षटकांत 9 बाद 198 धावा जमवल्या. ऑस्ट्रेलियाने तुलनेने किरकोळ असलेले हे आव्हान 24.5 षटकांतच सहज पार केले.
विजयासाठी 199 धावांचे आव्हान असताना ॲलिसा हिलीने अवघ्या 77 चेंडूंत 20चौकारांसह 113 धावांची आतषबाजी केली तर फोएबे लिचफिल्डने 72 चेंडूंत 84 धावा झोडपल्या. तिच्या खेळीत 12 चौकार व एका उत्तुंग षटकाराचा समावेश राहिला. या दोन्ही सलामीवीरांनी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत बांगला देशच्या गोलंदाजांच्या मर्यादा चव्हाट्यावर आणल्या.
प्रारंभी, सोभना मोस्तारीच्या झुंजार अर्धशतकानंतरही, ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज अलाना किंग आणि जॉर्जिया वेअरहॅम यांनी बांगला देशच्या धावगतीवर अंकुश ठेवला. मोस्तारीने तिच्या वन डे कारकिर्दीतील दुसरे आणि या विश्वचषकातीलही दुसरे अर्धशतक झळकावत बांगला देशला 9 बाद 198 अशी सर्वोच्च एकदिवसीय धावसंख्या उभारण्यास मदत केली होती.
संक्षिप्त धावफलक - बांगला देश : 9 बाद 198 (मोस्तारी नाबाद 66, हैदर 44; किंग 2/18, वेअरहॅम 2/22). ऑस्ट्रेलिया : 24.5 षटकांत बिनबाद 202. (ॲलिसा हिली नाबाद 113, लिचफिल्ड नाबाद 84).