मेलबर्न : वृत्तसंस्था
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला स्पेनच्या राफेल नदालने एकतर्फी झालेल्या सामन्यात बोलिव्हियाच्या हुजो डेलियेनला पराभूत करीत ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्या फेरीत प्रवेश मिळवला. पाच वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन मारिया शारापोव्हाला पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धेबाहेर पडावे लागले. नदालने दोन तासांच्या आत हा सामना 6-2, 6-3, 6-0 असा जिंकत चमक दाखवली. नदालच्या नजरा यावेळी 20 व्या ग्रँडस्लॅम किताबाकडे असणार आहेत.
यासोबत कमीत कमी दोन वेळा सर्व चारही ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याची नदालची इच्छा आहे. 'ही सकारात्मक सुरुवात आहे. पहिल्याच फेरीत सरळ सेटमध्ये विजय मिळवणे चांगले आहे,' असे नदाल म्हणाला. फेडरर व गतविजेता नोव्हाक जोकोव्हिचसुद्धा दुसर्या फेरीत पोहोचले आहेत.
दुसरीकडे महिला एकेरीच्या सामन्यात शारापोव्हाला सरळ सेटमध्ये पराभूत व्हावे ललगले. माजी अव्वल मानांकित खेळाडू शारापोव्हाला क्रोएशियाच्या 19 व्या मानांकित डोन्ना वेकिचकडून 6-3, 6-4 असे पराभूत व्हावे लागले. या स्पर्धेत 2008 ची चॅम्पियन शारापोव्हाला वाईल्ड कार्ड मिळाले होते. प्रतिबंधानंतर पुनरागमन केलेल्या शारापोव्हाला खराब फॉर्म व फिटनेसचा सामना करावा लागत आहे. गेल्यावर्षी खांद्याच्या दुखापतीमुळे तिला बर्याच स्पर्धेत सहभागी होता आलेले नाही. सलग तीन ग्रँडस्लॅममध्ये पहिल्या फेरीतीच तिला गाशा गुंडाळावा लागला. ब्रिटनच्या योहाना कोंताला पहिल्या फेरीत ट्युनिशियाच्या बिनमानांकित ओंस जाबेऊरकडून 6-4, 6-2 असे पराभूत व्हावे लागले. इटलीच्या 18 वर्षीय जानिक सिनेरने ऑस्ट्रेलियाच्या मॅक्स परसेलला 7-6, 6-2, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.