

लाहोर : जोश इंग्लिसने 77 चेंडूंतच शतक साजरे करत नंतर 86 चेंडूंत नाबाद 120 धावांची तडफदार खेळी साकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आयसीसी चॅम्पियन्स चषकातील साखळी सामन्यात इंग्लंडचा 5 गडी राखून फडशा पाडला. इंग्लंडने 8 बाद 351 धावांचा डोंगर रचल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने तोडीस तोड प्रत्युत्तर देत 47.3 षटकांत 5 बाद 356 धावांसह धडाकेबाज विजय साकारला. या सामन्यात एकत्रित 707 धावांची आतषबाजी झाली. यात 64 चौकार व 16 उत्तुंग षटकारांचा समावेश राहिला.
या लढतीत इंग्लंडची 8 बाद 351 ही चॅम्पियन्स चषकातील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने यानंतरही जिगरबाज खेळ साकारत अक्षरश: विजय खेचून आणला. इंग्लिसला अॅलेक्स कॅरी (69), लॅबुशेन (47), मॅक्सवेल नाबाद (32) यांची उत्तम साथ लाभली.
तत्पूर्वी, बेन डकेटचे धडाकेबाज दीडशतक आणि जो रूटच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 351 धावांचा डोंगर रचला. डकेटने 143 चेंडूंत 17 चौकार व 3 षटकारांसह 165 धावांची आतषबाजी केली, तर जो रूटने 78 चेंडूंत 4 चौकारांसह 68 धावांचे योगदान दिले. या दोन्ही संघांचा हा यंदाच्या चॅम्पियन्स चषक ातील पहिलाच सामना होता.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि याचा इंग्लंडच्या फलंदाजांनी पुरेपूर लाभ घेत त्रिशतकी मजल मारली. या लढतीत दुसर्याच षटकात फिल सॉल्टला बेन ड्वार्शुईसने बाद केले. 30 यार्डच्या वर्तुळात उभ्या असलेल्या अॅलेक्स कॅरीने हवेत झेपावत एकहाती शानदार झेल टिपत सॉल्टची खेळी संपुष्टात आणली. बेन ड्वार्शुईसने जेमी स्मिथला बाद करून ऑस्ट्रेलियाला दुसरा बळी मिळवून दिला. यानंतर जो रूट आणि बेन डकेट यांनी डावाची धुरा सांभाळली होती.