

केर्न्स; वृत्तसंस्था : ग्लेन मॅक्सवेलच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसर्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात थरारक विजय मिळवला. 173 धावांच्या आव्हानात्मक लक्षाचा पाठलाग करताना एका क्षणी सामना गमावण्याच्या स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाला मॅक्सवेलने अवघ्या 36 चेंडूंत नाबाद 62 धावांची खेळी करत एक चेंडू आणि दोन गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.
173 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार मिचेल मार्शने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले. मात्र, अखेरच्या क्षणी मॅक्सवेलने दाखवलेला ‘बिग शो’च सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. या पराभवामुळे महत्त्वाच्या सामन्यांमध्ये अखेरच्या क्षणी सामना गमावण्याची दक्षिण आफ्रिकेची समस्या पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
तसे पाहता, मधल्या षटकांमध्ये कॉर्बिन बॉशच्या (3/26) भेदक गोलंदाजीमुळे संघाची अवस्था 14 व्या षटकात 6 बाद 122 अशी झाली होती. सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकलेला दिसत होता. 19 व्या षटकात बॉशने दोन चेंडूंवर दोन बळी घेतल्याने ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली.
अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 9 धावांची गरज होती आणि स्ट्राईकवर मॅक्सवेल होता. लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर मॅक्सवेलने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ साधला. त्याने एक चौकार मारून सामना आवाक्यात आणला आणि षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिव्हर्स-हुकचा अप्रतिम फटका मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने डेवाल्ड ब्रेव्हिस आणि ड्युसेन यांच्या शानदार फलंदाजीमुळे निर्धारित 20 षटकांत 172 धावा उभारल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झम्पाने 24 धावांत 2 बळी घेत दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीला लगाम घातला होता.