

ब्रिस्बेन; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियन ‘अ’ संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय ‘अ’ महिला संघाच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडाली. विश्वचषक संघातून वगळण्यात आलेल्या स्फोटक फलंदाज शेफाली वर्माचा 35 धावांचा एकाकी लढा वगळता इतर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. त्यामुळे, अनधिकृत कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताची अवस्था 5 बाद 93 अशी बिकट झाली होती. पावसाच्या व्यत्ययाने खेळ लवकर थांबवावा लागला.
अॅलन बोर्डर फील्डवर सुरू झालेल्या या सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जॉर्जिया प्रेस्टविजने (3/25) भारतीय फलंदाजीला सुरुवातीलाच हादरे दिले. भारताची अवस्था 5 बाद 93 अशी असताना पावसाने सामन्यात व्यत्यय आणला आणि पंचांना दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. पहिल्या दिवशी केवळ 23.2 षटकांचाच खेळ होऊ शकला. खेळ थांबला तेव्हा, राघवी बिश्त 26 धावांवर, तर राधा यादव 8 धावांवर खेळत होत्या.
संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ महिला संघ : 23.2 षटकांत 5 बाद 93 (शेफाली वर्मा 35, राघवी बिश्त नाबाद 26; जॉर्जिया प्रेस्टविज 3/25).