

दुबई; वृत्तसंस्था : यंदाची आशिया चषक स्पर्धा दि. 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये होईल, अशी घोषणा आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी शनिवारी जाहीर केले. ही स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आयोजित करणार असून यात आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे.
स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळवली जाईल, जी 2026 मध्ये भारत आणि श्रीलंका येथे होणार्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी चांगली तयारी ठरेल. या स्पर्धेत एकूण 19 सामने खेळवले जातील, तर अंतिम सामना 28 सप्टेंबर रोजी होईल. गेल्या आवृत्तीत भारताने श्रीलंकेला पराभूत करत विजेतेपद मिळवले होते. भारताने या स्पर्धेत आजवर आठवेळा जेतेपद मिळवले आहे.
भारत-पाकिस्तान या स्पर्धेत एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीनदा लढती होऊ शकतात, असे संकेत आहेत. यातील गट फेरीत एक सामना होईल. दोन्ही संघ सुपर फोरसाठी पात्र ठरले तर तेथे दुसरा सामना होईल आणि त्यानंतर फायनलमध्येही हेच दोन्ही संघ पोहोचले तर तेथे तिसरी व निर्णायक लढत रंगू शकते.
तारीख लढत
9 सप्टेंबर अफगाण वि. हाँगकाँग
10 सप्टेंबर भारत वि. यूएई
11 सप्टेंबर बांगला देश वि. हाँगकाँग
12 सप्टेंबर पाकिस्तान वि. ओमान
13 सप्टेंबर बांगला देश वि. श्रीलंका
14 सप्टेंबर भारत वि. पाकिस्तान
15 सप्टेंबर यूएई वि. ओमान
16 सप्टेंबर बांगला देश वि. अफगाण
17 सप्टेंबर पाकिस्तान वि. यूएई
18 सप्टेंबर श्रीलंका वि. अफगाण
19 सप्टेंबर भारत वि. ओमान
20 ते 26 सप्टे. सुपर फोर फेरी
28 सप्टेंबर अंतिम फेरी