

पर्थ; वृत्तसंस्था : अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडने शनिवारी अविस्मरणीय, झंझावाती शतक झळकावत संपूर्ण सामन्याचे चित्र पालटले आणि ऑस्ट्रेलियाने 3 दिवस बाकी असतानाच इंग्लंडवर 8 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. 205 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हेडने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ रणनीतीला त्याच पद्धतीने उत्तर दिले आणि हेच या सामन्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले. उस्मान ख्वाजा जखमी झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडला सलामीला बढती देण्यात आली आणि त्याने अवघ्या 69 चेंडूंमध्ये शतकी खेळी करत इंग्लिश वेगवान गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
5 सत्रांमध्ये खेळल्या गेलेल्या 3 डावांमध्ये वेगवान गोलंदाजांचे वर्चस्व अधोरेखित झाले. पर्थ येथे 113 षटकांत 468 धावांत 30 बळी पडले. यापैकी, 19 बळी पहिल्या दिवशी आणि 11 बळी दुसर्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपूर्वी पडले. दुसर्या डावात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य होते. हेड तात्पुरता सलामीवीर म्हणून फलंदाजीला उतरला होता. मात्र, येथे त्याने 83 चेंडूंमध्ये दमदार 123 धावा कुटल्या. त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत 16 वेळा चेंडू चौकारासाठी फटकावले तर चारवेळा उत्तुंग षटकार लगावले.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 13 धावांची गरज असताना, हेड आणखी एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. मात्र, तोवर ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2 बाद 205 धावांसह सामना जिंकला. पाच सामन्यांच्या या मालिकेतील दुसरी कसोटी 4 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमधील गाबा येथे सुरू होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 172.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 132.
इंग्लंड दुसरा डाव : 164.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव (टार्गेट 205) : 28.2 षटकांत 2 बाद 205. (ट्रॅव्हिस हेड 83 चेंडूंत 16 चौकार, 4 षटकारांसह 123. मार्नस लॅबुशेन 49 चेंडूंत 6 चौकार, 1 षटकारासह नाबाद 51).