

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अॅरिना सबालेंकाने शनिवारी अमेरिकेच्या अॅमांडा अॅनिसीमोव्हाला सरळ सेटमध्ये हरवून आपल्या कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आणि त्याचबरोबर अमेरिकन जेतेपद कायम राखण्यातही यश प्राप्त केले.
आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात सबालेंकाने अॅनिसीमोव्हाच्या कमकुवत सर्व्हिसचा फायदा घेत 6-3, 7-6 (7/3) असा विजय मिळवला. बेलारूसची 27 वर्षीय सबालेंका या वर्षात ऑस्ट्रेलियन आणि फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये पराभूत झाली होती; पण येथे त्याची आणखी पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेत तिने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मागील दोन्ही पराभवांची पुरेपूर भरपाई करत तिने प्रतिस्पर्धी अॅनिसीमोव्हाचे ग्रँडस्लॅम विजेतेपदाची महत्त्वाकांक्षा मोडीत काढली. दोन महिन्यांपूर्वीच विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात इगा स्वायटेककडून तिला 6-0, 6-0 अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.
अॅनिसीमोव्हाने याआधी सबालेंकाविरुद्ध 9 पैकी 6 सामने जिंकले होते. विशेष म्हणजे यात विम्बल्डनच्या उपांत्य फेरीतील विजयाचादेखील समावेश होता. पण, आपल्या कारकिर्दीतील सातवा ग्रँडस्लॅम फायनल सामना खेळणार्या सबालेंकाने येथे तिचा सर्व अनुभव पणाला लावला आणि अॅनिसीमोव्हाचा प्रतिकार मोडून काढला. सबालेंकाने पुन्हा एकदा टायब्रेकमधील तिची अपवादात्मक कौशल्ये दाखवत विजय निश्चित केला. तिने आपला सलग 19 वा टायब्रेक जिंकून एक तास 34 मिनिटांत सामना संपवला. दुसरीकडे, अॅनिसीमोव्हाला महत्त्वाच्या क्षणी ‘ब्रेक पॉईंटस्’चा फायदा घेता न आल्यामुळे पश्चात्ताप झाला, याउलट सबालेंकाने तिच्या 6 पैकी 5 ’ब्रेक पॉईंटस्’चे ’ब्रेक’मध्ये रूपांतर केले.
पहिल्या सेटच्या सुरुवातीला अॅनिसीमोव्हाला तीन ’ब्रेक पॉईंटस्’चा फायदा घेता आला नाही. तरीही, तिनेे तिसर्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. तिने बॅकहँडने कॉर्नरमध्ये विनर मारून ‘ब्रेक पॉईंट’ मिळवला आणि नंतर जोरदार फोरहँड विनर मारून ‘ब्रेक’ मिळवला. त्यानंतर तिने 2-2 अशी बरोबरी साधली. आठव्या गेममध्ये अॅनिसीमोव्हाची सर्व्हिस पुन्हा डळमळीत झाली. तिने सबालेंकाला 15-40 वर दोन ‘ब्रेक पॉईंटस्’ दिले. सबालेंकाने त्याचा फायदा घेतला आणि पहिला सेट आपल्या नावावर केला.
दुसर्या सेटच्या सुरुवातीलाच सबालेंकाने अॅनिसीमोव्हाच्या खराब सर्व्हिसचा फायदा घेतला आणि 3-1 अशी पूर्णपणे नियंत्रणात असलेली आघाडी घेतली. पण, अॅनिसीमोव्हाने अजूनही हार मानली नव्हती. अंतिमत: मॅच पॉईंट देण्याऐवजी, तिने अॅनिसीमोव्हाला ‘ब्रेक पॉईंट’ दिला. पण, टायब्रेकमध्ये सबालेंकाने पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले आणि निसटत्या फरकाने विजय निश्चित केला.
1. सबालेंका यू.एस. ओपनमध्ये सलग दोन महिला एकेरी विजेतेपदे जिंकणारी 2014 नंतरची पहिलीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी, 2012 ते 2014 दरम्यान सेरेना विल्यम्सने ही कामगिरी केली होती. सबालेंकापूर्वी, ओपन इरामध्ये (1968 नंतर) ही कामगिरी केवळ काही निवडक खेळाडूंनी केली आहे. यात सेरेना विल्यम्स (2012-2014), किम क्लिस्टर्स (2009-2010), व्हीनस विल्यम्स (2000-2001), मोनिका सेलेस (1991-1992), स्टेफी ग्राफ (1988-1989, 1995-1996), मार्टिना नवरातिलोव्हा (1983-1984, 1986-1987), आणि ख्रिस एव्हर्ट (1975-1978) यांचा समावेश आहे.
2. सबालेंका आता ग्रँडस्लॅम स्पर्धेत 100 सामने जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली. याआधी 2025 मध्ये विम्बल्डनमध्ये इगा स्वियातेकने हा टप्पा गाठला होता. योगायोग म्हणजे या दोन्ही दिग्गज टेनिसपटूंनी अॅनिसीमोव्हाला नमवत आपापल्या कारकिर्दीतील 100 वा ग्रँडस्लॅम विजय नोंदवला.
3. ओपन इरामध्ये हार्ड कोर्टवर पहिले चार ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकणारी अॅरिना सबालेंका ही तिसरी खेळाडू ठरली. यापूर्वी, नाओमी ओसाका आणि किम क्लाइस्टर्स यांनी असा पराक्रम गाजवला होता.