पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतील (Australian Open 2025) महिला एकेरीच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार बेलारुसची टेनिसपटू आर्यना सबालेंका (Aryna Sabalenka) हिने अपेक्षेप्रमाणे आज (दि.२२) फायनलमध्ये धडक मारली. गतविजेत्या सबालेंकाने रॉड लेव्हर अरेना येथे झालेल्या सामन्यात पॉला बडोसाचा ६-४, ६-२ असा पराभव केला. तिने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा गाठली आहे.
उपांत्य फेरीतील सामन्यात बडोसाने दमदार सुरुवात केली; परंतु पावसाचा व्यत्यय आला. पहिल्या सेटमध्ये र्यंत बडोसाकडे २-०, ४०-० अशी आघाडी होती; परंतू पावसानंतर सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर तिला तिहेरी-गेम पॉइंटमध्ये रूपांतरित करण्यात अपयश आले. सबालेंकाला अपेक्षेप्रमाणे पुनरागमन करत सलग चार गेम जिंकले. तसेच पहिला सेट ६-४ असा आपल्या नावावर केला. दुसर्या सेटमध्ये बडोसाच्या चुका कायम राहिल्याने सबालेंकाने ५-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. तिने एकही ब्रेक पॉइंट न गमावता दुसरा गेम ६-२ असा जिंकला. उपांत्य फेरीचा सामना फक्त एक तास २३ मिनिटांतच संपवत तिने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्नावर असणार्या इगा स्विटेक आणि चौथ्या क्रमांकावरील मॅडिसन कीजशी यांच्यात उपात्य सामन्यात विजयी होणार्या टेनिसपटूला फायनलमध्ये सबालेंकाचा मुकाबला करावा लागणार आहे.
सबालेन्का या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकसाठी उत्सुक आहे. अशी कामगिरी आतापर्यंत केवळ सात टेनिसपटूंना करता आली आहे. १९९९ मध्ये मार्टिना हिंगीसने ऑस्ट्रेलियन ओपन सलग तिसर्यांदा जिंकले होते. सबालेन्काने २०२३ च्या हंगामापासून आतापर्यंत हार्ड कोर्टवर खेळलेल्या एकूण २९ सामन्यांपैकी २८ सामने जिंकले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेत सलग १५ विजयांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली आर्यना आता मार्टिना हिंगिस (१९९७ ते १९९९) नंतर मेलबर्न पार्क येथे विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्यापासून फक्त एक विजय दूर आहे.