

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजपासून दिल्ली विरुद्ध रेल्वे यांच्यामध्ये रणजी ट्रॉफीतील सामना सुरु झाला आहे.या सामन्यामध्ये भारताचा स्टार फंलदाज माजी कर्णधार विराट कोहली देखील खेळत आहे. त्याने तब्बल 13 वर्षानंतर रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याला पाहण्यासाठी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियममध्ये तुडूंब गर्दी झाली आहे. या बरोबरच चाहते विराट...विराट करत त्याला प्रोत्साहन देत आहे.
दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने रेल्वेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत विराटसह संपूर्ण दिल्ली संघ मैदानात होता. रेल्वेच्या डावातील १२ वे षटक सुरू असताना विराट कोहलीचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानावर आला. अचानक तो धावत आला आणि विराटच्या पायांना स्पर्श केला. अरुण जेटली स्टेडियममध्ये घडलेल्या या घटनेदरम्यान विराट कोहलीचे कोमल हृदयही दिसून आले. जेव्हा सुरक्षा कर्मचारी त्या चाहत्याला घेऊन जात होते, तेव्हा त्यांचे त्याच्याशी वागणे चांगले नव्हते. अशा परिस्थितीत विराट कोहलीने त्याच्या चाहत्याला त्याला मारू नका किंवा शिव्या देऊ नका अशी विनंती केली.
विराट कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीचे चाहते उत्सुक होते. पहाटे 3 वाजल्यापासून अरुण जेटली स्टेडियमबाहेर चाहते मोठ्या संख्येने जमू लागले. चाहते स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी खूपच वेडे झाले होते. अशा परिस्थितीत स्टेडियमबाहेर गोंधळ उडाला, ज्यामुळे काही चाहते जखमी झाले. गेट क्रमांक 16 च्या बाहेर लोक एकमेकांना ढकलू लागले. यामुळे काही चाहते प्रवेशद्वाराजवळ पडले आणि जखमी झाले.
विराटला पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तीन चाहते जखमी झाले. तर पोलिसांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. काही लोकांनी त्यांचे बूट आणि चप्पल तिथेच सोडले. दिल्ली जिल्हा आणि क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी जखमी चाहत्यांवर गेटजवळ उपचार केले. एका चाहत्याच्या पायाला पट्टीही बांधण्यात आली होती. गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला.