पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) हा २०२४ चा आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष टी-२० खेळाडू (ICC 2024 Awards ) ठरला आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजने आयोजित केलेल्या टी-२० विश्वचषकात त्याने चमकदार कामगिरी केली होती. भारताला विजेतेपद जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, अर्शदीप नुकताच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे.
अर्शदीपने 2024 मध्ये वर्षी १८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३६ विकेट्स घेतल्या. २०२४ मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, त्याला रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्यासह आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम टी-२० आंतरराष्ट्रीय संघातही स्थान देण्यात आले होते.
२०२४ आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष टी-२० नामांकित खेळाडूंमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमचाही समावेश होता. गेल्या वर्षी कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये बाबर टी-२० स्वरूपात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने २३ डावांमध्ये ३३.५४ च्या सरासरीने आणि १३३.२१ च्या स्ट्राईक रेटने ७३८ धावा केल्या, ज्यामध्ये सहा अर्धशतकांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड हा पुरस्कारासाठी नामांकित झालेला तिसरा खेळाडू होता. २०२४ मध्ये हेड ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने १५ डावांमध्ये ३८.५० च्या सरासरीने आणि १७८.४७ च्या स्ट्राईक रेटने ५३९ धावा केल्या, ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता.
झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा यालाही नामांकित खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले होते. गेल्या वर्षी रझा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये दुसरे सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. रझाने २३ डावांमध्ये २८.६५ च्या सरासरीने आणि १४६.५४ च्या स्ट्राईक रेटने ५७३ धावा केल्या, ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. रझाने गेल्या वर्षी २३ सामन्यांमध्ये २४ विकेट्स घेतल्या ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी १८ धावांत पाच विकेट्स अशी होती.
आयसीसीशी बोलताना अर्शदीप म्हणाला की, "आतापर्यंतच्या क्रिकेटच्या प्रवासात सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकणे हा होता. आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष टी-२० खेळाडू पुरस्कार जिंकणे हा आनंद आहे. मी देवाचे खूप आभार मानतो. माझ्यातील सर्वोत्तम कामगिरी होण्यास मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. माझ्यासाठी खास क्षण म्हणजे टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना. मला फक्त संघासाठी माझे सर्वोत्तम करायचे होते."