

कोची; वृत्तसंस्था : सर्व चर्चा आणि अटकळींना पूर्णविराम देत, विद्यमान विश्वविजेत्या अर्जेंटिना संघाने यंदा नोव्हेंबरमध्ये केरळमध्ये एक फिफा मैत्रीपूर्ण सामना खेळणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे फुटबॉल चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून ही माहिती प्रसिद्ध केली. या निवेदनानुसार, संघाचे दोन आंतरराष्ट्रीय दौरे निश्चित झाले आहेत. यानुसार, ऑक्टोबर 2025 मध्ये लिओनेल स्कालोनीच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत मैत्रीपूर्ण सामने आणि नोव्हेंबर 2025 मध्ये लुआंडा, अंगोला तसेच केरळ, भारत येथे 2 सामने होतील. या सामन्यांसाठी प्रतिस्पर्धी संघ अद्याप निश्चित झालेले नाहीत.
केरळचे क्रीडामंत्री व्ही. अब्दुलरहिमान यांनी सोशल मीडिया खात्यावरून या घोषणेचे स्वागत केले. मेस्सी आणि त्यांचा संघ नोव्हेंबर 2025 मध्ये केरळमध्ये खेळणार आहे. केरळमध्ये अर्जेंटिना संघाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे आणि ही घोषणा त्यांच्यासाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे, असे त्यांनी याप्रसंगी म्हटले आहे.
अर्जेंटिना संघाने यापूर्वी 2011 मध्ये भारताचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी व्हेनेझुएला विरुद्ध कोलकाता येथील प्रसिद्ध सॉल्ट लेक स्टेडियमवर सामना खेळला होता. तब्बल 14 वर्षांनंतर अर्जेंटिनाचा संघ पुन्हा एकदा भारतीय भूमीवर खेळणार असल्याने फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे, 2022 मध्ये फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत करून फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने केरळमधील आपल्या चाहत्यांचे विशेष आभार मानले होते.