Andre Russell | ‘रसेल मसल’चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले 2 सामने खेळून मायदेशातच घेणार निवृत्ती; वादळी पर्वाचा अस्त
Andre Russell
आंद्रे रसेलPudhari File Photo
Published on
Updated on

जमैका; वृत्तसंस्था : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या स्फोटक फलंदाजीने जगभरातील क्रिकेट चाहत्यांना वेड लावणारा आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतील पहिले दोन सामने खेळून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही सामने त्याच्या मायदेशात, जमैकामधील सबिना पार्क येथे होणार असून, आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर तो अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळेल.

आपल्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीत रसेलने 84 सामन्यांमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व केले. यात त्याने 1078 धावा आणि 61 बळी घेतले आहेत. तो 2012 आणि 2016 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणार्‍या वेस्ट इंडिज संघाचा एक अविभाज्य भाग होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा जगभरातील टी-20 लीगमध्ये रसेल एक ‘वादळ’ म्हणूनच ओळखला जातो. त्याने विविध लीगमध्ये मिळून 561 टी-20 सामन्यांमध्ये 168 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 9316 धावा केल्या आहेत आणि 485 बळीही पटकावले आहेत.

वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनीही रसेलचे कौतुक करताना त्याला एक ‘खरा कडवा प्रतिस्पर्धी’ म्हटले आहे. रसेलच्या जागी मालिकेतील अखेरच्या तीन सामन्यांसाठी मॅथ्यू फोर्डला संघात स्थान देण्यात आले आहे. रसेलच्या निवृत्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका धडाकेबाज युगाचा अंत झाला असला तरी, जगभरातील फ्रँचायझी लीगमध्ये त्याचा जलवा मात्र सुरूच राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news