अमन म्हणजे नावातच शांती असलेल्या अमन सेहरावतने शांतीत क्रांती करीत भारताला सहावे पदक मिळवून दिले. विनेशच्या अनपेक्षित धक्क्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीपटूंना पदकाविनाच परतावे लागेल, असे वाटत असताना अमन सेहरावतने पदक जिंकले. भारताच्या 21 वर्षीय अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक पटकावले आहे. अमनने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात 57 किलो वजनी गटात चुरशीच्या लढतीत पुर्तो रिकोच्या डॅरेयन क्रूझ टोई या कुस्तीपटूचा 13-5 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकच्या 14 व्या दिवशी भारताने सहावे पदक जिंकले आहे.
पुरुष गटाच्या पहिल्या लढतीत अमनने नॉर्थ मॅकाडोनियाच्या व्हॅदिमीर इगोरोव्हचा 10-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर अल्बेनियाच्या झेलिम खानचे आव्हान होते आणि 2022 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारतीय कुस्तीपटूने 12-0 असे सहज पराभूत केले; पण पुढच्या फेरीत अव्वल मानांकित रेई हिगुचीने 10-0 अशा फरकाने भारतीय खेळाडूला पराभूत केले. त्यामुळे अमनला कांस्यपदकाच्या लढतीसाठी खेळावे लागले. डॅरेयन क्रूझने पॅन अमेरिकन स्पर्धेत 2022 व 2023 मध्ये पुर्तो रिकोचे प्रतिनिधित्व करताना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले होते. 2020 मध्ये तो अमेरिकेकडून याच स्पर्धेत खेळला होता आणि ‘कांस्य’ जिंकले होते. त्यामुळे त्याच्यासमोर अमनचा निभाव लागणे अवघडच होते; पण अमनने त्याचा धुव्वा उडवला.
अमन आशियाई चॅम्पियन राहिला असून, 23 वर्षांखालील जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे. भारताला कुस्तीत पदकाची अपेक्षा होती, ती अमनने पूर्ण केली आहे. याआधी सर्वांना विनेश फोगाटकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, अतिरिक्त वजनामुळे तिला सामन्यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आले. अशा परिस्थितीत अमनचे हे पदक कुस्तीत भारतासाठी दिलासादायक बाब ठरले आहे.
भारताच्या अमनने पहिल्या फेरीत वर्चस्व राखले. कांस्यपदकाच्या लढतीत पहिल्या 40 सेकंदांतच क्रूझने पहिला गुण घेतला. पहिल्या फेरीत अमनने पुर्तो रिकोच्या कुस्तीपटूवर 6-3 अशी आघाडी घेतली. दुसर्या फेरीत क्रूझ पूर्णपणे दमलेला दिसला. परिस्थिती अशी बनली की, त्याला ब्रेक घ्यावा लागला. यानंतर आक्रमक खेळाने दोन-दोन गुण घेत अमनने आपली आघाडी वाढवली. प्रतिस्पर्ध्याला दमवत त्याच्याकडून गुण वसूल करण्याचे त्याचे तंत्र चांगलेच यशस्वी ठरले. शेवटचे एक मिनिट बाकी असताना अमनने 12-5 अशी आघाडी मिळवली होती. वेळ संपता संपता 1 गुण घेत अमनने 13 गुणांसह सामना जिंकला. अशाप्रकारे भारताला 14 व्या दिवशी सहावे पदक मिळाले आहे.
अमनने लहानपणीच आई-वडील गमावले. वयाच्या 11 व्या वर्षी अमन अनाथ झाला. तो 10 वर्षांचा असताना त्याची आई कमलेश यांचे डिप्रेशनमुळे निधन झाले. एका वर्षानंतर अमनचे वडील सोमवीर यांनीही हे जग सोडले. काकांनी त्याची काळजी घेतली.
अमन सेहरावतच्या पदकाने ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कुस्तीची शान कायम ठेवली आहे. 2008 पासून भारताने सलग 5 ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये पदके जिंकली आहेत. हॉकीनंतर भारताची सर्वाधिक 8 ऑलिम्पिक पदके कुस्तीतून आली आहेत. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच 1952 मध्ये खाशाबा जाधव यांनी भारतासाठी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले. त्यानंतर 56 वर्षे भारताला कुस्तीमध्ये पदक मिळाले नाही आणि त्यानंतर सुशील कुमारने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून हा दुष्काळ संपवला. तेव्हापासून भारतीय कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके जिंकत आहेत. रविकुमार दहियाने 57 किलो वजनी गटात गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. अमनने राष्ट्रीय निवड चाचणीत रवीचा पराभव करून ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली होती.