अजिंक्यने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी : गौतम गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघासमोर दुसर्‍या कसोटीसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विराट कोहलीचे भारतात परतणे, पृथ्वी शॉचे फॉर्मात नसणे आणि मोहम्मद शमीला झालेली दुखापत यामुळे अंतिम 11 जणांच्या संघात कोणाला स्थान द्यायचे यावरून सध्या चर्चांना उधाण आले आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करेल. या सामन्याआधी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने अजिंक्य रहाणेला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला, माझ्या मते अजिंक्य रहाणेने आता चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला हवे. जर गिल, राहुल किंवा विहारी यांना त्याच्याआधी संधी दिली तर यातून चुकीचा मेसेज दिला जाऊ शकतो. रहाणेने पाच गोलंदाजांनिशी खेळण्याचा आग्रह धरायला हवा. सध्या रवींद्र जडेजा ज्या फॉर्मात आहे ते पाहता अजिंक्य सहज स्वतःला चौथ्या क्रमांकावर बढती देऊ शकतो. स्मिथ, लॅम्बुश्चग्ने, वेड, हेड, पेन यासारखे फलंदाज असताना भारताने पाच गोलंदाजांनिशी मैदानावर उतरायला हवे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरला  दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news