

शिमकेंट, कझाकिस्तान : वृत्तसंस्था : भारतीय नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंह तोमरने कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सुरू ठेवत पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. अंतिम फेरीत दमदार प्रदर्शन करत त्याने स्पर्धेत भारताला आणखी एक गौरवशाली क्षण मिळवून दिला.
रविवारी झालेल्या या अंतिम सामन्यात 24 वर्षीय ऑलिम्पियन ऐश्वर्यने 462.5 गुणांची नोंद करत अव्वल स्थान पटकावले. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच त्याने आघाडी कायम ठेवली होती. नीलिंग (गुडघ्यावर बसून) पोझिशनमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने भक्कम पायाभरणी केली. प्रोन (झोपून) पोझिशनमध्ये त्याला अपेक्षित यश मिळाले नाही, तथापि, स्टँडिंग फेरीमध्ये दीड गुणांपेक्षा जास्त आघाडी कायम ठेवत त्याने विजय निश्चित केला.
या स्पर्धेत चीनच्या वेन्यू झाओला 462 गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर जपानच्या नाओया ओकादाने 445.8 गुणांसह कांस्यपदक जिंकले. याच प्रकारात अंतिम फेरीत अन्य भारतीय नेमबाज, चैन सिंग चौथ्या स्थानी तर अखिल शेओरान पाचव्या स्थानी राहिले.