

लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफीतील संघर्षपूर्ण लढतीत अफगाणिस्तानच्या झुंजार वाघांनी इंग्लंडला 8 धावांनी हरवून स्पर्धेतून बाहेर फेकले. ‘ब’ गटात इंग्लंडने दोन्ही सामने गमावल्यामुळे त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीतून गाशा गुंडाळावा लागला आहे. तर या विजयाने अफगाणिस्तानचे आव्हान जिवंत राहिले असून, त्यांना आता सेमीफायनल गाठायची असल्यास ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवावा लागेल. इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळायचा असून, तो जिंकला तरी ते सेमीफायनल गाठू शकणार नाहीत.
लाहोरच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या ताफ्यातून 18 नंबर जर्सी घालून मैदानात उतरलेल्या इब्राहिम झद्रान याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी निर्धारित 50 षटकांत 7 बाद 325 धावा केल्या. इंग्लंडकडून रनमशिन जो रूटने (120) शतकी खेळी करीत हे आव्हान गाठण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, अफगाणिस्तानच्या चिवट गोलंदाजांनी इंग्लंडचा डाव 49.5 षटकांत 317 धावांत संपुष्टात आणला. उमरझाईने 58 धावांत 5 विकेटस् घेतल्या.
इंग्लंडकडून फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली; पण सॉल्ट 13 चेंडूंत 12 धावा करून बाद झाला. पाठोपाठ जॅमी स्मिथनेही 9 धावांवर विकेट गमावली; पण त्यानंतर डकेटने जो रूटसोबत 68 धावांची भागीदारी करत डाव सावरला. परंतु, 17 व्या षटकात डकेटला राशीद खानने पायचित पकडले. डकेटने 38 धावांवर विकेट गमावली. तरी रूटने हॅरी ब्रूकसह डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. ब्रूक बाद झाल्यानंतर रूटला कर्णधार जोस बटलरची साथ मिळाली. या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी करत सामन्यात रोमांच निर्माण केला. अखेर अजमतुल्ला उमरझाईने बाद करत ब्रेकथ्रू मिळवून दिला. बटलरनंतर लियाम लिव्हिंगस्टोनही 10 धावांवर माघारी परतला. दरम्यान, रूटने त्याचे शतक पूर्ण केले. पण इंग्लंडला 39 धावांची गरज असताना रूटचा अडथळा अजमतुल्लानेच दूर केला. रूटने 111 चेंडूंत 11 चौकार आणि एक षटकारासह 120 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी जीवतोड मेहनत करीत शेवटच्या तीन विकेटस् काढल्या आणि 8 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.
तत्पूर्वी, गुरबाज 6 (15), सेदीकुल्लाह अटल 4 (4) आणि रहमत शाह 4 (9) यांच्या रूपात अफगाण संघाला धक्क्यावर धक्के बसले. सलामीवीर इब्राहिम झद्रान तग धरून मैदानात उभा राहिला. त्याला कॅप्टन शाहिदीची साथ मिळाली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी रचली. हशमतुल्ला शाहिदी 67 चेंडूंत 40 धावांची खेळी करून माघारी फिरला. नंतर इब्राहिम झद्रानने अजमतुल्ला उमरझाईसोबत पाचव्या विकेटसाठी 92 धावांची दमदार भागीदारी केली. तो माघारी फिरल्यावर अनुभवी मोहम्मद नबीने त्याला साथ दिली. सहाव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारी केली. अखेरच्या षटकांत 55 चेंडूंत दोघांनी 111 धावांची भागीदारी रचली. इब्राहिम झद्रानने 146 चेंडूंत 12 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 177 धावा ठोकल्या. ‘आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील ही कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे.
संक्षिप्त धावफलक अफगाणिस्तान : 50 षटकांत 7 बाद 325 धावा. (इब्राहिम झद्रान 177, मोहम्मद नबी 40, अजमतुल्ला उमरझाई 41. जोफ्रा आर्चर 3/64, लियाम लिव्हिंगस्टोन 2/28) इंग्लंड : 39.5 षटकांत सर्वबाद 317 धावा. (जो रूट 120, बेन डकेट 38, जोस बटलर 38. अजमतुल्ला उमरझाई 5/58, मोहम्मद नबी 2/58.)