

दुबई : वृत्तसंस्था
सेदीकुल्लाह (73) व उमरझाई (53) यांच्या दणकेबाज फलंदाजीच्या बळावर अफगाणने आशिया चषक स्पर्धेच्या सलामी लढतीत तुलनेने दुबळ्या हाँगकाँग संघाचा तब्बल 94 धावांनी एकतर्फी फडशा पाडला. प्रारंभी, अफगाणने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 188 धावांचा डोंगर रचला, तर प्रत्युत्तरात हाँगकाँगला 20 षटकांत 9 बाद 94 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 189 धावांचे आव्हान असताना हाँगकाँगतर्फे बाबर हयातने सर्वाधिक 39, तर यासिमने 16 धावांचे योगदान दिले. मात्र, या दोघांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. अफगाणतर्फे फझलहक व गुलाबदिन यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, अजमतुल्ला उमरझाई, सेदीकुल्लाह अटल यांच्या झुंजार खेळीमुळे अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्ध 20 षटकांत 188/6 अशी धावसंख्या उभारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने खेळपट्टीचा फायदा उचलण्याचा निर्णय घेतला. मात्र, हाँगकाँगच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत इब्राहिम झद्रान (1) आणि रहमानुल्ला गुरबाझ (8) यांना स्वस्तात माघारी धाडले. मधल्या फळीतील सेदीकुल्लाह अटलने हार न मानता झुंजार खेळी केली. त्याने 52 चेंडूंत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 73 धावा फटकावल्या. त्याला मोहम्मद नबीने उत्तम साथ दिली. नबीने 26 चेंडूंत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावांची खेळी करत अटलसोबत 51 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
नबी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेला गुलबदिन नायब 5 धावा काढून लगेचच बाद झाला. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अजमतुल्लाह उमरझाईने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने 21 चेंडूंत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 53 धावांची वादळी खेळी केली. हे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अफगाणिस्तानसाठी सर्वात जलद अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीमुळे अफगाणिस्तानने 20 षटकांत 188 धावांपर्यंत मजल मारली. हाँगकाँगकडून किंचित शहा आणि आयुष शुक्ला यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
अफगाण : 20 षटकांत 6 बाद 188 (सेदीकुल्लाह 52 चेंडूंत 73, अजमतुल्ला 21 चेंडूंत 53, मोहम्मद नबी 33. अवांतर 10. आयुष व किंचित प्रत्येकी 2 बळी).
हाँगकाँग : 20 षटकांत 9 बाद 94. (बाबर हयात 39, यासीम मुर्तझा 16. फझलहक, गुलाबदिन प्रत्येकी 2 बळी).