National Games 2023 : बीच फुटबॉलमध्‍ये गोव्‍याचा उत्तराखंडला धक्‍का; साखळी फेरीतील लढतीत 18-5 फरकाने विजय | पुढारी

National Games 2023 : बीच फुटबॉलमध्‍ये गोव्‍याचा उत्तराखंडला धक्‍का; साखळी फेरीतील लढतीत 18-5 फरकाने विजय

पणजी; विवेक कुलकर्णी : राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेत बीच फुटबॉलमधील साखळी फेरीत यजमान गोव्‍याने उत्तराखंडला 18-5 फरकाने पराभवाचा जोरदार धक्‍का दिला. कोलवा बीचवर रंगलेल्‍या या लढतीत गोव्‍यातर्फे सतीश नाईकने 5 गोलसह विजयात मोलाचा वाटा उचलला.

गोव्‍याने या लढतीतील पहिल्‍या तीन सत्रातच 18 गोल नोंदवले आणि येथेच त्‍यांची सरशी होईल, हे जवळपास निश्‍चित झाले. यातील पहिल्‍या सत्रात 8, दुसर्‍या सत्रात 4 तर तिसर्‍या सत्रात 6 गोल नोंदवले. उत्तराखंडतर्फे पहिल्‍या व दुसर्‍या सत्रात प्रत्‍येकी 2 तर तिसर्‍या सत्रात 1 गोल झाला. गोव्‍याच्‍या आक्रमक खेळासमोर उत्तराखंडकडे काहीच प्रत्‍युत्तर नव्‍हते, हे या लढतीत प्रकर्षाने दिसून आले.

गोव्‍यातर्फे सतीश नाईकने 9, 10, 17, 28 व 30 व्‍या मिनिटाला प्रत्‍येकी एक गोल केला. याशिवाय, पेड्रोने 2, 10, 11 व 33 व्‍या मिनिटाला असे 4 गोल नोंदवले. रिचर्ड कार्डोझने 10, 23 व 33 व्‍या मिनिटाला गोल जाळ्याचा अचूक वेध घेतला. काशिनाथ राठोड व नेहल परब यांनी प्रत्‍येकी दोन गोल केले. लतिश कुंकोळकर व कार्ल जोशुआ डिसोझा यांनी प्रत्‍येकी एक गोल नोंदवला.

उत्तराखंडतर्फे सर्शहनने 3, 19 व 31 व्‍या मिनिटाला प्रत्‍येकी एक गोल केला. मेरी जेसिन व चंदन कारवा यांनी प्रत्‍येकी एक गोल नोंदवला. मात्र, इतका अपवाद वगळता या संघातील अन्‍य खेळाडूंनी पूर्ण निराशा केली. या स्‍पर्धेत गोव्‍याचे प्रशिक्षकपद ब्रुनो कॉटिन्‍हो तर उत्तराखंडचे प्रशिक्षकपद कुंदन चंद्रा सांभाळत आहेत.

Back to top button