पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आर्थिक दृष्ट्या संकटात सापडले आहेत. चॅपेल आर्थिक संकटात सापडले असून त्यांना मदत करण्यासाठी मित्रांकडून ऑनलाईन पद्धतीने पैसे गोळा केले जात आहेत. मित्रांनी त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहिम राबविली आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपेल हे २००५ ते २००७ या काळात भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे वादग्रस्त राहिला.
चॅपल यांनी 'न्यूज कॉर्प'शी बोलताना सांगितले, "माझी स्थिती फारशी वाईट नाही. मी निश्चितपणे सांगू इच्छित नाही की, मी संकटात आहे. कारण आम्ही संकटात नाहीत, मात्र, आम्हाला आजच्या खेळाडूंसारखे फायदे मिळत नाहीत. अनेकांना वाटते की, आम्ही क्रिकेट खेळलो म्हणून चैनीचे जीवन जगत आहोत."
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चॅपल 'हिचक' आणि त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'गो-फंड-मी' मोहिमेसाठी तयार झाले आहेत. या अंतर्गत, गेल्या आठवड्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दुपारच्या जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचे आयोजन एडी मॅग्वायर यांनी केले होते. त्यांचे भाऊ इयान आणि ट्रेव्हर यांनीही हजेरी लावली होती. चॅपल म्हणाले की, 'तो त्याच्या काळातील एकमेव खेळाडू नाही, जो आर्थिक समस्यांना तोंड देत आहे.'