PAK vs AUS : पाकिस्तान विरुद्धचे भारताचे रेकॉर्ड तुटले मात्र आस्ट्रेलियाने ठेवले अबाधित

PAK vs AUS : पाकिस्तान विरुद्धचे भारताचे रेकॉर्ड तुटले मात्र आस्ट्रेलियाने ठेवले अबाधित
Published on
Updated on

PAK vs AUS :  भारत पाकिस्तानकडून वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच पराभूत झाला. मात्र ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुद्धचे नॉक आऊट मधील अपराजित असण्याचे रेकॉर्ड कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचे १७७ धावांचे आव्हान १९ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेडने १७ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी केली. तर स्टॉयनिसने ३१ चेंडूत ४० धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियाचा विजय खेचून आणला. डेव्हिड वॉर्ननेही ४९ धावांचे मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानकडून शादाब खानने २६ धावात ४ विकेट घेत कांगारुंना धक्के दिले.

पाकिस्तानने ठेवलेल्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची ( PAK vs AUS ) सुरुवात अडखळती झाली. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात कर्णधार अॅरोन फिंचला शुन्यावर बाद केले. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी पाकिस्तानचा वेगवान मारा सावध फलंदाजी करत खेळून काढला.

या दोघांनी पॉवर प्लेच्या अखेरच्या दोन – तीन षटकात धावांची गती वाढवत संघाला अर्धशतकी मजल मारून दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. मात्र शादाब खानने मार्शला २८ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेला स्टीव्ह स्मिथही ५ धावांची भर घालून शादाब खानची शिकार झाला.

दरम्यान, आक्रमक डेव्हिड वॉर्नर आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. परंतु लेग स्पिन शादाब खानने पुन्हा एकदा कांगारुंना मोठा धक्का देत ३० चेंडूत ४९ धावांची खेळी करणाऱ्या वॉर्नरला बाद केले. वॉर्नरचे अर्धशतक अवघ्या १ धावेने हुकले.

शादाब खानने आपल्या अखेरच्या षटकात कांगारुंना अजून एक मोठा धक्का दिला. त्याने धोकादायक ग्लेन मॅक्सवेलची बॅट ७ धावांवर शांत करत ऑस्ट्रेलियाचा पाचवा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये धाडला. शादाबची ही चौथी शिकार होती. यानंतर स्टॉयनिस आणि वेडने १३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचे शतक धावफलकावर लावले.

PAK vs AUS :  स्टॉयनिस – वेडने विजय आणला खेचून

या जोडीने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत सामन्यात पुनरागमन करुन दिले. दोघांनी सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. स्टॉयनिसने आक्रमक फटके मारत सामना १२ चेंडूत २२ धावा असा आवाक्यात आणला. त्याला मॅथ्यू वेडने चांगली साथ दिली. मात्र १९ षटक टाकणाऱ्या शाहीन आफ्रिदीने टिच्चून मारा केला. दरम्यान, वेडला हसन अलीकडून २१ धावांवर जीवनदानही मिळाले. त्याचा फायदा उचलत त्याने शाहीन आफ्रिदीच्या चौथ्या चेंडूवर षटकार मारत सामना ८ चेंडूत १२ धावा असा आणला. वेडने पुढच्याच चेंडूवर अजून एक षटकार मारत सामना एक षटकार दूर आणून ठेवला. तो षटकार वेडने शाहीनच्या अखेरच्या चेंडूवर मारत एक षटक राखून पाकिस्तानचा पराभव केला.

PAK vs AUS : रिझवान – झमानची दमदार अर्धशतकी खेळी

तत्पूर्वी, युएईमध्ये सुरु असलेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये आज दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तान ऑस्ट्रेलियाशी ( PAK vs AUS ) भिडणार आहेत. दुबईत रंगत असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपले विनिंग कॉम्बिनेशन न बदलण्याचा निर्णय घेतला.

फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला ४७ धावांपर्यंत पोहचवले. यात बाबरचा २४ तर रिझवानचे २० धावांचे योगदान होते.

या दोघांनी पॉवर प्लेमधील आक्रमक भागीदारी पॉवर प्लेनंतर पुढे नेली. त्यांनी १० व्या षटकात संघाला ७१ धावांपर्यंत पोहचवले. मात्र अॅडम झाम्पाने ३३ चेंडूत ३९ धावांची खेळी करणाऱ्या बाबर आझमल बाद करून ही सलामी जोडी फोडली.

बाबर आझम बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवानने डावाची सुत्रे आपल्या हातात घेतली. त्याने १४ व्या षटकात पाकिस्तानला  शंभरी पार करुन दिली. यानंतर त्याने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रिझवानने फखर झमान बरोबर दुसऱ्या विकेसाठी अर्धशतकी भागीदारी रचली.

हे दोघे पाकिस्तानला १५० पार पोहचवणार असे वाटत असतानाच स्टार्कने रिझवानला ६७ धावांवर बाद केले. रिझवान आणि झमानने ७२ धावांची भागीदारी रचली. फखर झमानने रिझवान बाद झाल्यानंतर १८ व्या षटकात पाकिस्तानला १५० चा टप्पा ओलांडून दिला. मात्र कमिन्सने आसिफ अलीला शुन्यावर बाद केले.

त्यांनतर अखेरच्या दोन षटकात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचा धावांचा रथ रोखला. शोएब मलिकनेही शेवच्या षटकात फक्त १ धावेची भर घालून परतला. अखेर फखर झमानने स्टार्कच्या अखेरच्या षटकात सलग दोन षटकार मारत आले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर संघालाही १७६ धावांपर्यंत पोहचवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news