IND vs AUS : भारताची वन-डे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी; कांगारुंवर ९९ धावांनी मात | पुढारी

IND vs AUS : भारताची वन-डे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी; कांगारुंवर ९९ धावांनी मात

इंदूर : वृत्तसंस्था भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसर्‍या वन डे सामन्यात 99 धावांनी पराभव करत मालिकेत 2 – 0 ने विजयी आघाडी घेतली. इंदूर येथील सामन्यात शुभमन गिल (104) आणि श्रेयस अय्यर (105) या दोघांची शतके आणि के. एल. राहुल (52), सूर्यकुमार यादव (नाबाद 72) यांची अर्धशतके याच्या जोरावर भारताने 5 बाद 399 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकांत 317 धावांचे आव्हान आले होते. मात्र, भारतीय गोलंदाजांनी कांगारूंना 217 धावात गुंडाळत सामना 99 धावांनी जिंकला. भारताकडून अश्विनने 3 तर जडेजाने 3 विकेटस् घेतल्या. त्यांना प्रसिद्ध कृष्णाने 2 आणि शमीने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. कांगारूंकडून अ‍ॅबॉटने 54 तर वॉर्नरने 53 धावा केल्या.

भारताचे 399 धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या कांगारूंना दुसर्‍याच षटकात प्रसिद्ध कृष्णाने दोन धक्के देत ऑस्ट्रेलियाची कबर खोदण्यास सुरुवात केली. त्याने षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर मॅथ्यू शॉर्टला 2 धावांवर तर तिसर्‍या स्मिथला शून्यावर बाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 षटकांत 2 बाद 9 धावा अशी झाली असताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेन यांनी डाव सावरत संघाला 9 षटकांत 2 बाद 56 धावांपर्यंत पोहोचवले. मात्र, पावसामुळे सामना पुन्हा थांबला. अखेर दीड तासाने पावसाने उसंत दिल्याने सामना पुन्हा सुरू झाला, मात्र सामन्याची षटके कमी करण्यात आली आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 33 षटकांत 317 धावांचे आव्हान आले.

सामना पुन्हा सुरू झाल्यावर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने कांगारूंचे तीन फलंदाज टिपले. त्याने सेट झालेल्या वॉर्नरला 53 धावांवर बाद केले. त्यानंतर मार्नसचीही 27 धावांवर शिकार केली. गेल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणार्‍या इंग्लिसला देखील 6 धावांवर बाद केले. अश्विन पाठोपाठ भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने देखील कांगारूंना धक्के दिले. त्याने एलेक्स कॅरी आणि झम्पाला बाद केले. तर ग्रीन धावबाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या 8 विकेटस् गेल्या असताना विजय द़ृष्टिपथात आला; परंतु सीन अ‍ॅबॉटने भारतीय गोलंदाजांची सत्वपरीक्षा पाहत फटकेबाजी सुरू केली. त्याने 29 चेंडूंत अर्धशतक झळकावले. भारताच्या ढिसाळ गोलंदाजीने त्याला हातभार लावला. अखेर जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला आणि भारताच्या मालिका विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ऋतुराज गायकवाडने भारताच्या डावाची चांगली सुरुवात करून दिली, पण पहिल्या षटकात 2 चौकार मारल्यावर तो 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आणि त्याने एकामागोमाग एक अशी चौकारांची आतषबाजी केली. सामना रंगत असतानाच पावसाने रंगाचा भंग केला. जवळपास अर्धा तास खेळ वाया गेल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला. यानंतर श्रेयसबरोबर शुभमन गिलने देखील तुफान फटकेबाजी सुरू केली. दोघांनीही कांगारूंच्या गोलंदाजीचा समाचार घेत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया घातला.

ऋतुराजच्या रूपाने कांगारूंना भारताची पहिली विकेट घेण्यात यश आले असले तरी त्यांना भारताची दुसरी विकेट घ्यायला 200 धावा वाट पाहावी लागली. या 200 धावांच्या दरम्यान, श्रेयस अय्यरने आपले शतक पूर्ण केले होते तर शुभमन गिल आपल्या शतकाच्या उंबरठ्यावर होता. गिलने देखील आपले सहावे वन डे शतक पूर्ण करत भारताला 30 षटकांत 200 धावांचा टप्पा पार करून दिला. गिल आणि अय्यरने रचलेल्या भक्कम पायावर के.एल. राहुल, इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने सोनेरी कळस चढवला. के.एल.ने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली तर इशान किशनने 18 चेंडूंत 31 धावा ठोकत राहुलसोबत अर्धशतकी (59) भागीदारी रचली. यानंतर राहुलने सूर्यकुमारसोबत 53 धावांची भागीदारी रचत भारताला 350 धावांचा टप्पा पार करून दिला. 41 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमारने 37 चेंडूंत नाबाद 72 धावा ठोकल्या. याच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 षटकांत 5 बाद 399 धावा उभारल्या.

4 चेंडूत 4 षटकार सूर्याने ‘ग्रीन’ला केले ‘रेड’

सूर्यकुमार यादवने तर 44 व्या षटकात धुमाकूळच घातला. त्याने कॅमेरून ग्रीनच्या या षटकात पहिल्या चार चेंडूंत चार षटकार ठोकले. या षटकांत सूर्याने 26 धावा केल्या. तो सलग सहा षटकार ठोकणार असे वाटत होते; परंतु पुढचे दोन्ही चेंडू त्याने ऑफस्टम्पच्या बाहेर टाकून मार वाचवला. कॅमेरून ग्रीनने या सामन्यात शतक पूर्ण केले, पण हे शतक त्याने गोलंदाजी करताना दिलेल्या धावांचे ठरले. त्याने 10 षटकांत 103 धावा दिल्या आणि 2 विकेटस् घेतल्या.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसर्‍या वन डे सामन्यात श्रेयस अय्यरने दमदार शतक झळकावले. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाची मधल्या फळीतील चिंता वर्ल्डकपपूर्वी मिटली आहे. ऋतुराज गायकवाड स्वस्तात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर तिसर्‍या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. त्याने सुरुवातीपासून कांगारूंना झोडपायला सुरुवात केली. दमदार फलंदाजी करत अय्यरने आधी 41 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर काही काळ संथगतीने खेळ केल्यावर अखेर 86 चेंडूंत शतक ठोकून बॅट उंचावली.

श्रेयसने चिंता मिटवली

श्रेयस अय्यर गेले काही महिने दुखापतीमुळे त्रस्त होता. त्याने काही दिवसांपूर्वीच संघात पुनरागमन केले. तसेच त्याला वर्ल्डकपसाठीही संघात स्थान मिळाले. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, पण सर्व प्रश्नांना आणि टीकाकारांना श्रेयस अय्यरने आज उत्तर दिले. मैदानात आल्यापासूनच त्याने आपली छाप उमटवली. त्याने सुरुवातीला आक्रमक खेळी करत अर्धशतक झळकावले. त्यानंतर स्पिनर्स गोलंदाजीला आल्यावर संयमी खेळ केला. त्याने अखेर 86 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले.

शुभमन गिल.. सिक्सर किंग

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर दुसर्‍या वन डेतही त्याने शतक पूर्ण केले. तसेच त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला. गिलने या सामन्यात 4 षटकार मारले. तो या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत आपला कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले. 2023 मध्ये गिलच्या एकूण षटकारांची संख्या 46 झाली, तर रोहित शर्माने आतापर्यंत 43 षटकार मारले आहेत.

Back to top button