भारताची ऑस्ट्रेलियावर 5 विकेटस्नी मात; शुभमन, ऋतुराज, सूर्या, राहुलची अर्धशतके | पुढारी

भारताची ऑस्ट्रेलियावर 5 विकेटस्नी मात; शुभमन, ऋतुराज, सूर्या, राहुलची अर्धशतके

मोहाली : वृत्तसंस्था विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना भारताने आरामात जिंकला. त्यांनी ऑस्ट्रेलियाला 5 विकेटस्नी हरवले. मोहम्मद शमीच्या 5 विकेटस् आणि नंतर शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि के.एल. राहुल यांची अर्धशतके ही भारतीय विजयाची वैशिष्ट्य ठरली. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा 276 धावा केल्या. भारताने हे टार्गेट 5 विकेटस् आणि 8 चेेंडू शिल्लक ठेवून पार केले. या विजयाने भारताची बेंच स्ट्रेंग्थही (राखीव फळी) तितकीच ताकदीची आहे, हे सिद्ध झाले. 5 विकेटस् घेणार्‍या मोहम्मद शमी याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 24) खेळवण्यात येणार आहेत.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मराठमोळा ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनी या सलामी जोडीने पाहुण्या संघाचा चांगलाच समाचार घेतला. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या गिलने पुन्हा एकदा कमाल करताना टी-20 चा खेळ दाखवला. सुरुवातीपासून रुद्रावतार दाखवून गिलने पाहुण्या गोलंदाजांवर दबाव कायम ठेवला. संधी मिळताच ऋतुराजने देखील चौकार ठोकून सहकारी फलंदाजाला साथ दिली, पण भारताच्या सुसाट चाललेल्या गाडीला अ‍ॅडम झम्पाने ब्रेक लावले. त्याने आधी ऋतुराज गायकवाड (71) याला पायचित केले. ऋतुराजने मिळालेल्या संधीचे सोने करताना 10 चौकारांच्या मदतीने 77 चेंडूंत 71 धावांची अप्रतिम खेळी केली. ऋतुराज आणि शुभमन यांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 142 धावांची भागीदारी नोंदवली.

त्यानंतर दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यरला दणक्यात पुनरागमन करण्यात अपयश आले. अय्यर केवळ तीन धावांवर असताना कॅमेरून ग्रीनच्या हातून धावबाद झाला अन् भारताला दुसरा झटका बसला. पाठोपाठ झम्पाने शुभमन गिल (74) चा त्रिफळा उडवला. त्यामुळे नाबाद 142 धावा असा सशक्त धावफलक 3 बाद 151 असा झाला. केवळ 9 धावांत तीन दिग्गज फलंदाज तंबूत परतले. गिलने दोन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने 74 धावा कुटल्या.

पाठोपाठ तीन विकेटस् पडल्या तरी भारताची धावगती उत्तम होती, त्यामुळे पुढे येणारे फलंदाजही निवांत होते. इशान किशन (18) पॅट कमिन्सकडून बाद झाल्यावर कर्णधार केे. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी जमली. या दोघांनी अर्धशतके झळकावून संघाचा विजय निश्चित केला, पण विजयाच्या उंबरठ्यावर असताना सूर्या (50 धावा) बाद झाला. सीन एबोटला चौकार ठोकून राहुलने अर्धशतक पूर्ण केले, तर पुढच्या चेेंडूवर षटकार ठोकून विजय साकारला. राहुल 58 धावांवर तर रवींद्र जडेजा 3 नाबाद राहिला.
तत्पूर्वी, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण ऑस्ट्रेलियाला 50 षटकांत 10 बाद 276 धावांपर्यंतच मजल मारता आली. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ गारद केला. कांगारूंकडून सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर जोश इंग्लिसने 45 आणि स्टीव्ह स्मिथने 41 धावांचे योगदान दिले.

शमीने बांधले विक्रमाचे इमले

मोहम्मद शमीने 10 षटकांत 1 निर्धाव षटक फेकताना 51 धावांवर 5 विकेटस् घेतल्या. या कामगिरीनसह शमीने अनेक विक्रम नावावर केले. भारताकडून 93 वन डे सामन्यांत सर्वाधिक 170 विकेटस् घेणार्‍या गोलंदाजाचा मान त्याने पटकावला. मोहम्मद शमीने शनिवारी 51 धावांत 5 विकेटस् घेतल्या. त्याची ही वन डेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. यापूर्वी 2019 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध 69 धावांत 5 विकेटस् घेतल्या होत्या. त्याआधी वेस्ट इंडिज (4-16) आणि पाकिस्तान (4-35) विरुद्ध त्याची सर्वोत्तम गोलंदाजी होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणार्‍या भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी 37 बळींसह दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. त्याने अजित आगरकर (36), जवागल श्रीनाथ (33) व हरभजन सिंग (32) यांना मागे टाकले. या विक्रमात कपिलदेव 45 विकेटस्सह अव्वल स्थानी आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीत मोहम्मद शमी तिसरा आला आहे. कपिलदेव यांनी 1983 मध्ये ट्रेंट ब्रिज येथे 43 धावांत 5 विकेटस् घेतल्या होत्या. अजित आगरकरने 2004 मध्ये मेलबर्नवर 42 धावांत 6 विकेटस् घेतलेल्या. भारतीय खेळपट्टींवर 2007 मध्ये वन डेत पाच विकेटस् घेणारा झहीर खान (वि. श्रीलंका) हा शेवटचा जलदगती गोलंदाज होता. 16 वर्षांनंतर मोहम्मद शमीने हा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये भारतीय सलामीवीरांनी सर्वाधिक 17 शतकी भागीदारी केल्या आहेत. भारताने आज इंग्लंडचा (16) विक्रम मोडला. शुभमन गिल व ऋतुराज यांनी 142 धावांची भागीदारी केली.

Back to top button