Boundaries for the ODI World Cup : वन डे वर्ल्डकपसाठी सीमारेषा असणार किमान सत्तर मीटरची | पुढारी

Boundaries for the ODI World Cup : वन डे वर्ल्डकपसाठी सीमारेषा असणार किमान सत्तर मीटरची

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात रंगणार्‍या वन डे वर्ल्डकपसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सीमारेषेची लांबी सत्तर मीटर असावी, असे आदेश दिले आहेत. त्याखेरीज अनेक ठिकाणच्या क्युरेटर्ससाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार खेळपट्ट्यांवर अधिक गवत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात अनेक भागांमध्ये दव असते. नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरते. नाणेफेकीची भूमिका काही प्रमाणात प्रभावी व्हावी याकरिता आयसीसीने हे पाऊल उचलले आहे. याखेरीज आयसीसीने क्युरेटर्सना खेळपट्ट्यांवर अधिक गवत ठेवण्यासाठीही बजावले आहे.

भारतीय खेळपट्ट्या सामान्यतः फिरकीसाठी अधिक अनुकूल असतात; परंतु आयसीसीने क्युरेटर्सना खेळपट्ट्यांवर अधिक गवत ठेवण्यास सांगितले आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजही सामन्यात किमया दाखवू शकतील. याचा अर्थ प्लेईंग-11 संघांमध्ये आणखी वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. देशामध्ये उत्तर, पश्चिम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये प्रचंड दव पडेल, असा अंदाज आहे. चेन्नई आणि बंगळूरमध्ये होणार्‍या सामन्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दव पडल्याचा फिरकीपटूंच्या कामगिरीवर मोठा प्रभाव पडतो. मात्र, खेळपट्टीवर अधिक गवत असल्यामुळे संघांना फिरकीपटूंवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही.

सीमारेषेचा आकार 70 मीटर

संतुलन राखण्यासाठी आयसीसीने प्रत्येक क्षेत्राची सीमा वाढवण्याचे आदेश दिले आहेत. सर्व स्टेडियमच्या क्युरेटर्सना सांगण्यात आले आहे की, सीमेची लांबी 70 मीटर असावी. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, सीमारेषेची किमान लांबी 65 मीटर, तर कमाल लांबी 85 मीटर असते. जुन्या स्टेडियममध्ये सीमारेषेची लांबी 70 ते 75 मीटरच्या दरम्यान होती. आता ती 70 मीटर असणार आहे. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी महिनाभरापूर्वी आशिया चषकासाठी संघाची घोषणा करताना दवासंबंधी सुतोवाच केले होते.

दहा शहरांमध्ये सामने

वर्ल्डकप 2023 चे सामने 10 शहरांमध्ये खेळवले जातील. अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम), बंगळूर (एम. चिन्नास्वामी स्टेडियम), चेन्नई (एम. ए. चिदंबरम स्टेडियम), दिल्ली (अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम), धरमशाळा (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम), हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, उप्पल). याशिवाय कोलकाता (ईडन गार्डन), लखनौ (अटलबिहारी वाजपेयी क्रिकेट स्टेडियम), मुंबई (वानखेडे स्टेडियम), पुणे (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम). दरम्यान, गुवाहाटी आणि तिरुअनंतपुरममध्ये 29 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान सराव सामने होणार आहेत.

Back to top button