Asia Cup Final : आशियाचा राजा कोण? पाच वर्षांच्या चषकाचा दुष्काळ संपवण्यास टीम इंडिया सज्ज
कोलंबो (वृत्तसंस्था) : आशियाचा राजा कोण, हे ठरवण्यासाठी पावसाच्या वर्षावात सुरू झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची यात्रा आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात आज (रविवारी) विजेतेपदासाठी अंतिम लढत रंगणार आहे. टीम इंडियाने गेल्या पाच वर्षांत एकाही स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही, किताबाचा हा दुष्काळ संपवण्यासाठी रोहितसेना मैदानात उतरणार आहे; तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली गेलेली पत पुन्हा मिळवण्यासाठी श्रीलंकेला मोठी संधी मिळाली आहे. या दोघांच्या युद्धात आशियाचा राजा कोण ठरणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
166 विरुद्ध 97
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 166 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये भारताने 97 सामने जिंकले आहेत. याशिवाय श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. 11 सामन्यांचा निकाल जाहीर झाला नाही आणि 1 सामना बरोबरीत संपला. या आशिया कपमध्ये भारताने सुपर फोर फेरीत श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला.
प्रेमदासा स्टेडियमवरील दोन्ही संघांचे रेकॉर्ड
कोलंबोतील प्रेमदासा स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात 37 एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 18 वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेने 16 सामने जिंकले आहेत. 3 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 11 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर प्रथम खेळणार्या श्रीलंकेने 11 वेळा भारताविरुद्ध विजय मिळवण्यात यश मिळवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 7 सामने जिंकले आहेत. भारताने 2018 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शेवटचे विजेतेपद पटकावले होते, जेव्हा रोहितच्या संघाने दुबई येथे आशिया कपमध्ये बांगलादेशचा तीन विकेटस् राखून पराभव केला होता. या विजेतेपदानंतर भारताला महत्त्वाच्या सामन्यात आपला लौकिक राखणे जमले नाही.
भारत 2019 च्या वनडे वर्ल्डकप आणि 2022 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. तर 2019 आणि 2023 च्या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता. श्रीलंकेचा विचार करता गेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवले आहे; पण ही स्पर्धा टी-20 प्रकारात झाली होती; पण त्यानंतर संघाची खूपच घसरण झाली. देशातील ढासळलेली अर्थव्यवस्था आणि क्रिकेट मंडळातील भ्रष्टाचार याचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला. यंदा त्यांना वर्ल्डकपसाठी पात्रता फेरी खेळावी लागली. पण, काही महिन्यांपूर्वीच्या तुलनेत संघ त्यावेळच्या तुलनेत खूपच मजबूत दिसत आहे. त्यामुळे या स्पर्धेचे विजेतेपद त्यांच्यासाठी मनोबल वाढवणारे असेल. पण, आज होणार्या अंतिम सामन्यात त्यांना फिरकी गोलंदाज महिश तिक्षणा याची कमतरता जाणवेल.
फायनलमध्ये भारत-श्रीलंका सातव्यांदा आमने-सामने
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी (17 ऑक्टोबर) होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल. फायनलमध्ये पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यानंतर श्रीलंकेने सुपरफोरमध्ये पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपदाच्या सामन्याचे तिकीट मिळवले. आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका संघ अंतिम फेरीत आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोन्ही संघ अंतिम फेरीत 7 वेळा आमने सामने आले आहेत. या दोघांमध्ये 1988 मध्ये पहिला फायनल सामना खेळला गेला होता. ज्यात भारताने बाजी मारली होती. या दोघांमध्ये आतापर्यंत झालेल्या 7 फायनलमध्ये भारताने 4 विजेतेपदे जिंकून आघाडी कायम ठेवली आहे. तसेच श्रीलंकेने भारताविरुद्ध केवळ तीनवेळा विजेतेपदाचा सामना जिंकला आहे. या दोघांमध्ये दुसरा विजेतेपदाचा सामना 1991 मध्ये झाला होता, ज्यामध्ये भारताने पुन्हा एकदा विजय मिळवला होता. त्यानंतर 1995 मध्ये या दोघांमध्ये खेळलेला सामना भारताने पुन्हा जिंकला.
दोन्ही संघांचीही हॅट्ट्रिक
भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यांमध्ये भारताने तीनवेळा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली. यानंतर 1997, 2004 आणि 2008 मध्ये श्रीलंकेने भारताविरुद्ध सलग तीन फायनल जिंकून हॅट्ट्रिक नोंदवली. मात्र, यानंतर दोघांमध्ये शेवटची विजेतेपदाची लढत 2010 मध्ये झाली, ज्यामध्ये भारताने विजय मिळवून आघाडी घेतली. आता 2023 मध्ये होणार्या विजेतेपदाच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजेतेपदाच्या लढतीत दोघांमध्ये बरोबरी होणार की, भारत आघाडी कायम ठेवणार?.

