कोलंबो : वृत्तसंस्था आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेने पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानने 7 बाद 252 धावा केल्या. प्रत्युत्तरात कुशल मेेंडिस (91) आणि सदिरा समरविक्रमा (48) यांनी श्रीलंकेला विजयी मार्गावर आणले. शाहिन आफ्रिदीने 41 व्या षटकात सामन्याचे पारडे फिरवले होतेे; पण चरिथ असलंका याने ऐन मोक्याच्या क्षणी चतुर खेळ करीत श्रीलंकेला विजयी केले. आशिया चषकाच्या किताबासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी अंतिम लढत होणार आहे.
संपूर्ण आशिया चषक स्पर्धेवर हुकूमत गाजवणार्या वरुणराजाने याही सामन्यात आपला खेळ दाखवला. दिवसभर पडणार्या पावसामुळे सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. दुपारी अडीच वाजता होणारी सामन्याची नाणेफेक 5 वाजता झाली. तर सामन्याला 5.15 वाजता सुरुवात झाली. मात्र, हा सामना प्रत्येकी 45 षटकांचा करण्यात आला; पण 28 व्या षटकांत पुन्हा पाऊस आल्याने खेळ थांबवावा लागला. यात 3 षटके कमी करण्यात आली. त्यामुळे हा सामना प्रत्येकी 42 षटकांचा करण्यात आला.
पाकिस्तानने दिलेले टार्गेट गाठताना श्रीलंकेच्या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली. परंतु, कुसल परेरा (17) धावचित झाल्याने ही लय तुटली. त्याचा जोडीदा पथूम निसंका चांगला खेळत होता, त्याला शादाब खानने परतीचा झेल देण्यास भाग पाडले. यानंतर कुशल मेंडिस आणि सदिरा समरविक्रमा यांची जोडी जमली. दोघांनी सावध, संयम आणि धैर्याने पाकिस्तानी गोलंदाजीला तोंड देत आवश्यक धावगती कायम राखली. दोघांनी 42 चेंंडूत अर्धशतकी भागीदारी केली. कुशल मेंडिसने 47 चेंडूत आपले अर्धशतक गाठले. 154 चेंडूत संघाच्या दीडशे धावा फलकावर लागल्या. 28 व्या षटकाचा शेवटचा चेंडू शाहिनने बाऊन्सर टाकला हा समर विक्रमाच्या हेल्मेटवर आदळला; पण विक्रमा पुन्हा नेटाने मैदानावर उभा राहिला. पण यानंतर काही वेळाने त्याचा संयम सुटला. इफ्तिकार खान याला पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टिचित झाला. त्याने 51 चेंडूत 48 धावा केल्या; पण दुसर्या बाजूला कुशल मेंडिसने आपले काम सुरूच ठेवले होते. कुशल नव्वदीत पोहोचला होता. तो स्वत: शतकाकडे आणि संघाला विजयाकडे घेऊ चालला होता; पण इफ्तिकार अहमदने पुन्हा लंकेचा घात केला. मोहम्मद हॅरिस याने एक्स्ट्रा कव्हरवर एक अफलातून झेल घेत कुशलची खेळी संपुष्टात आणली. त्याने 87 चेंडूंत 81 धावा करताना 8 चौकार आणि 1 षटकार मारले. त्याच्या जागी आलेल्या दासून शनाकाने धावगतीचे प्रेशर कमी करण्यासाठी फटका मारण्याचा प्रयत्न केला; पण लाँगऑनवर मो. नवाजने त्याचा झेल टिपला.
इफ्तिकारचा हा तिसरा बळी ठरला. यावेळी श्रीलंकेला 30 चेंडूत 26 धावांची आवश्यकता होती. चरिथ असलंका आणि धनंजय डिसिल्व्हा ही जोडी मैदानावर होती. शेवटच्या 18 चेंडूत 20 धावांची आवश्यकता होती. झमान खानच्या या षटकात 8 धावा गेल्या. शेवटच्या 12 चेंडूंत 12 धावांची गरज लंकेला उरली होती. शाहिन आफ्रिदीच्या हातात चेंडू होता. पहिल्या दोन चेेंडूंत 3 धावा गेल्या. श्रीलंकेच्या द़ृष्टीने इथेपर्यंत सगळे व्यवस्थित चालले होते; पण अनुभवी शाहिनने तिसर्या चेंडूपासून सामन्याचे पारडे फिरवले. त्याचा तिसरा चेंडू निर्धाव गेला. चौथा चेेंडू फुलटॉस पडला यावर डिसिल्व्हाने षटकार मारण्याचा प्रयत्न केला; पण सीमारेषेवर मोहम्मद वासिमने त्याचा झेल घेतला. पुढच्या चेेंडूवर वेल्लालागे शुन्यावर बाद झाला. शाहिनने या षटकात दोन विकेटस् घेतल्याने शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांचे टार्गेट उरले.
शेवटचे षटक टाकण्यासाठी झमान खान आला. त्याच्या पहिल्या 3 चेंडूत 2 धावा गेल्या. चौथ्या चेंडूवर मधुशान धावचित झाला. पाचव्या चेंडूवर असलंकाला चौकार मिळाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूंवर 2 धावांची आवश्यता होती. असलंकाने अतिशय हुशारीने मिडविकेटकडे चेंडू टोलवून 2 धावा घेतल्या आणि श्रीलंकेला फायनलमध्ये पोहोचवले.