चमत्कार झाला… यूएईने न्यूझीलंडला हरवले | पुढारी

चमत्कार झाला... यूएईने न्यूझीलंडला हरवले

दुबई : वृत्तसंस्था गेल्या आठवड्यातच वेस्ट इंडिजने टी-20 मालिकेत भारताचा 3-2 असा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. आता क्रिकेट विश्वात एक मोठा चमत्कार घडला आहे. आयसीसीचा पूर्णकालीन सदस्य दर्जा नसलेल्या (कसोटी न खेळणार्‍या) संयुक्त अरब अमिरात संघाने टी-20 सामन्यात बलाढ्य न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव करून इतिहास रचला आहे.

फिरकीपटू अयान अफझल खानच्या घातक स्पेलच्या जोरावर यूएईने न्यूझीलंडला अवघ्या 142 धावांवर रोखले आणि त्यानंतर कर्णधार मोहम्मद वसीमच्या स्फोटक अर्धशतकी खेळीच्या जोरावर संघाने अवघ्या 16 षटकांत हे लक्ष्य गाठले. यासह यूएईने न्यूझीलंडविरुद्ध प्रथमच कोणत्याही फॉरमॅटमध्ये विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

या पराभवासोबत न्यूझीलंडच्या नावावरही एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे. कोणत्याही फॉरमॅटमध्ये एसोसिएट टीमकडून पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी किवी संघ त्यांच्या क्रिकेटच्या इतिहासात कधीही एसोसिएट टीमकडून हरला नव्हता. तसेच आता सर्व 12 कसोटी खेळणारे संघ किमान एकदा तरी एसोसिएट टीमविरुद्ध हरले आहेत.

Back to top button