चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय संघाने पहिल्या 7 फलंदाजांमध्ये किमान 3 फलंदाज डावखुरे खेळवावेत, स्ट्राईक रोटेट करताना याचा विशेष लाभ होईल, अशी सूचना माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली. आगामी आशिया चषक व मायदेशातच खेळवल्या जाणार्या वन-डे विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पहिल्या सात फलंदाजांत अष्टपैलू रवींद्र जडेजासह आणखी दोन फलंदाज डावखुरे असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
'माझ्या मते तीन डावखुरे फलंदाज संघात असायलाच हवेत. आता ही जबाबदारी सर्वप्रथम निवडकर्त्यांची आहे. कारण, त्यांचे सर्व खेळाडूंवर लक्ष असते. कोणता खेळाडू बहरात आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना असते. अशा परिस्थितीत जर तिलक वर्मा बहरत असेल, तर त्याला संघात घ्यावे, जर यशस्वी जैस्वाल फॉर्ममध्ये असेल, तर त्याला प्राधान्य द्यावे. अशा प्रकारे रणनीती राबवणे आवश्यक आहे,' असे शास्त्री पुढे म्हणाले.
31 ऑगस्टपासून खेळवल्या जाणार्या आगामी आशिया चषक स्पर्धेत केएल राहुल व श्रेयस अय्यर असे दोघे फलंदाज पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर 11 सदस्यीय अंतिम संघात तिघे डावखुरे फलंदाज खेळवणे व्यवस्थापनासाठी कठीण असणार आहे.
शास्त्री यांनी याप्रसंगी तिसरा डावखुरा फलंदाज या नात्याने इशान किशनला पसंती दिली. 'मागील 6 ते 8 महिन्यांच्या कालावधीत इशान किशनने उत्तम प्रगल्भता दाखवली आहे. शिवाय, मागील 15 महिन्यांत तो यष्टीरक्षणदेखील करत आला आहे. जडेजासह संघात पहिल्या सातमध्ये किमान तिघे फलंदाज डावखुरे असणे आवश्यक आहे,' असे ते येथे म्हणाले. विंडीजविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला यशस्वी सुरुवात करणार्या तिलक वर्माचीही त्यांनी मुक्त कंठाने प्रशंसा केली. 'तिलक वर्माच्या खेळावर मी विशेष प्रभावित आहे आणि डावखुरे फलंदाज स्ट्राईक रोटेट करत प्रतिस्पर्ध्यांची रणनीती उधळून लावू शकतात. अशा परिस्थितीत डावखुर्या फलंदाजांवर भर देणे आवश्यक आहे,' असे ते शेवटी म्हणाले.