भारत चौथ्यांदा चॅम्पियन | पुढारी

भारत चौथ्यांदा चॅम्पियन

चेन्नई : वृत्तसंस्था भारतीय हॉकी संघाने एशियन हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चा किताब जिंकला. अंतिम सामन्यात दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतरही भारतीय वाघांनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करीत मलेशियाला 4-3 असे हरवले. मध्यंतराला मलेशियन संघ 3-1 ने आघाडीवर होती; परंतु शेवटच्या दोन सत्रात भारताने सामन्याचे चित्र पलटून टाकले. भारताने चौथ्यांदा हा किताब जिंकला आहे. याचबरोबर त्यांनी या स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद मिळवणार्‍या पाकिस्तानला मागे टाकले आहे.

भारताकडून जुगराज सिंह (9’), हरमनप्रीत सिंह (45’), गुरजांत सिंह (45’) आणि आकाशदीप सिंहने (56’) गोल केले. अंतिम सामन्यात मलेशियाने आक्रमक सुरुवात केली; परंतु सामन्यातील पहिला गोल भारताकडून झाला. 9 व्या मिनिटाला संघाला पेनल्टी मिळाली. कर्णधार हरमनप्रीत सिंह मैदानावर नव्हता. त्यामुळे जुगराज सिंहने पेनल्टीवर गोल करून भारताला खाते उघडून दिले. भारताला 1-0 अशी आघाडी मिळाली, परंतु 14 व्या मिनिटाला मलेशियाने बरोबरी साधली. त्यांच्या अबू कमल अजराईने मैदानी गोल नोंदवला. मलेशिया हा या स्पर्धेतील सर्वात जास्त मैदानी गोल करणारा संघ आहे. यानंतर भारताला पेनल्टी मिळाली, परंतु त्यांना गोल करता आला नाही.

सामन्यात मलेशियाचा दबाव जाणवत होता. पहिला क्वार्टर बरोबरीत संपल्यानंतर दुसर्‍या क्वार्टरमध्ये 17 व्या मिनिटाला मलेशियाच्या राजी रहिमने पेनल्टीवर गोल करून संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. या सत्रात भारतीय संघ पिछाडीवर पडलेला दिसत होता. चेंडूवर मलेशियाचेच नियंत्रण होते, यातच त्यांनी तिसरा गोल केला. दुसर्‍या सत्रात 27 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर मुहम्मद अमनुद्दिनने हा गोल नोंदवून मलेशियाला 3-1 असे आघाडीवर नेले.

तिसर्‍या सत्रात मात्र भारताने दमदार कमबॅक केले. हे सत्र संपता संपता भारताने सलग दोन गोल डागून सामन्यात बरोबरी साधली. 45 व्या मिनिटाला पहिल्यांदा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टीवर गोलसंधी साधली. त्यानंतर लगेच गुरजंत सिंहने भारतासाठी तिसरा बरोबरीचा गोल केला. बरोबरीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भारतीय संघाने चौथ्या सत्रात जोमाने खेळ केला. त्यांनी सतत मलेशियन गोलपोस्टवर हल्ले केले. यात मलेशियाचा बचाव विस्कळीत झाला. याचा फायदा घेत 56 व्या मिनिटाला आकाशदीप सिंहने भारताचा चौथा गोल नोंदवून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

असे झाले गोल :

9 भारताला नवव्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. यावर जुगराज सिंहने गोल केला.

14 अबू कमल अजराईने मलेशियाला 14 व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली.

17 राजी रहिमने 17 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून मलेशियाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

27 मुहम्मद अमनुद्दिनने 27 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून मलेशियाला 3-1 असे आघाडीवर नेले.

45 कर्णधार हरमनप्रीत सिंहने 45 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोलसंधी साधली.

45 गुरजंत सिंहने 45 व्या मिनिटालाच भारतासाठी तिसरा बरोबरीचा गोल केला.

56 आकाशदीप सिंहने 56 व्या मिनिटाला भारताचा चौथा आणि विजयी गोल केला.

Back to top button