युवराज सिंगला मोठा दणका ! अटक आणि सुटका | पुढारी

युवराज सिंगला मोठा दणका ! अटक आणि सुटका

हांसी ; पुढारी ऑनलाईन

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला रविवारी हरियाणातील हांसी येथे पोलिसांनी अटक केली. 8 महिन्यांपूर्वी युवराजने भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याच्यावर जातिवाचक टिप्पणी केली होती आणि त्याविरोधात हांसी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. त्याने ही टिप्पणी मागच्या वर्षी रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅट दरम्यान केली होती आणि त्यात त्याने युजवेंद्र चहलवर अपमानजनक टिप्पणी केली होती.

हांसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टाने युवराजला जामीन दिला होता. हांसी पोलिसांनी औपचारिकता म्हणून त्याला अटक केली. यावेळी त्याला काही प्रश्‍न विचारण्यात आले आणि नंतर त्याला सोडण्यात आले. युवराजसह सुरक्षारक्षक आणि 4-5 स्टाफ व वकील होते.

नेमके काय आहे प्रकरण?

युवराज सिंगच्या विरोधात हरियाणा येथे एफआरआय दाखल करण्यात आला आहे. रोहित शर्मासोबत इन्स्टाग्रामवर चॅट करताना त्याने चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याची ही टिप्पणी दलित समाजाचा अपमान करणारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्याबाबत नंतर युवीने माफीही मागितली होती. हरियाणामधील हिस्सार येथील वकिलांनी 8 महिन्यांपूर्वी पोलिस स्थानकात युवीविरोधात तक्रार दाखल केली होती.

Back to top button