RCB vs KKR : विराटच्या आरसीबीचा पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये 'गेम ऑफ' - पुढारी

RCB vs KKR : विराटच्या आरसीबीचा पुन्हा एकदा प्ले ऑफमध्ये 'गेम ऑफ'

शारजाह : पुढारी ऑनलाईन

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा कोलकाता नाईट रायडर्सने ( RCB vs KKR ) ४ विकेट्सनी पराभव केला आणि आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधला प्रवास थांबवला. केकेआरने आरसीबीच्या १३९ धावांचे आव्हान ६ विकेट्सच्या मोबदल्यात १९.४ षटकात पूर्ण केले. केकेआरकडून शुभमन गिलने सर्वाधिक २९ धावा केल्या. त्याला व्यंकटेश अय्यर आणि सुनिल नारायणने प्रत्येकी २६ धावा करुन चांगली साथ दिली. आरसीबीकडून हर्षल पटेल, यझुवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आरसीबी बरोबरच त्यांचा कर्णधार विराट कोहलीच्याही कर्णधारपदाची अखेर झाली. यानंतर विराट आरसीबीचे नेतृत्व करणार नाही.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या १३९ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने ( RCB vs KKR ) चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने पहिल्या विकेसाठी ४१ धावांची भागीदारी केली. मात्र पॉवर प्लेच्या अखेरच्या षटाकात मोठा फटका मारण्याच्या नादात शुभमन गिल २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर अय्यरने राहुल त्रिपाठीच्या साथीने पॉवर प्लेमध्ये केकेआरला ४८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

मात्र पॉवर प्लेनंतर राहुल त्रिपाठीला ६ धावांवर यझुवेंद्र चहलने पायचीत पकडले. त्रिपाठी बाद झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि नितीश राणाने केकेआरला १० षटकात ७४ धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, अय्यरला मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर शाहबादकडून जीवनदान मिळाले.

फलंदाजीतही नारायण नारायण

व्यंकटेशला या जीवनदानाचा फायदा उचलता आला नाही. तो हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ३० चेंडूत २६ धावा करुन बाद झाला. व्यंकटेश बाद झाल्यानंतर बढती देण्यात आलेल्या सुनिल नारायणने झंजावाती फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने डॅनियल ख्रिस्तियनच्या एका षटकात २२ धावा चोपून काढल्या. त्याने षटकात ३ षटकार खेचले.

या ऐआक्रमक खेळीमुळे केकेआरने १२ व्या षटकातच शंभरी पार केली. मात्र दुसऱ्या बाजूने नितीश राणा चाचपडत खेळत होता. अखेर त्याची २५ चेंडूतील २३ धावांची खेळी चहलने संपवली. त्यानंतर नारायण आणि दिनेश कार्तिकने भागीदारी रचण्यास सुरुवात केली.

मोहम्मद सिराजने गेममध्ये आणला ट्विस्ट 

मात्र मोहम्मद सिराजने १५ चेंडूत २६ धावांची खेळी करणाऱ्या सुनिल नारायणचा त्रिफळा उडवत केकेआरला पाचवा धक्का दिला. पाठोपाठ दिनेश कार्तिकला १० धावांवर बाद करत केकेआरची अवस्था बिकट केली. केकेआरला १५ चेंडूत अजून १३ धावांची गरज होती. मात्र त्यांचे सेट झालेले फलंदाज माघारी गेले होते. सिराजने आपल्या षटकाचे शेवटचे दोन चेंडूत १ धाव देत सामना १२ चेंडूत १२ धावा असा अटीतटीचा केला.

पुन्हा शेवटच्या षटकाचा खेळ

क्रिजवर आलेल्या शाकिब अल हसन आणि इऑन मॉर्गनने १९ व्या षटकात ५ धावा केल्या त्यामुळे आता केकेआरला विजयसाठी अखेरच्या षटकात ७ धावांची गरज होती. शेटवचे षटक ख्रिस्तियनला देण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण इतरांचे सर्व षटके संपली होती. शाकिबने याचा फायदा उचलत पहिल्याच चेंडूवर चौकार मारत सामना ५ चेंडूत ३ धावा असा आला. त्यानंतर शाकिबने १ धाव करत सामना ४ चेंडूत २ धावा असा आणला. मॉर्गनने धोका न पत्करता एक धाव करुन आरसीबीच्या १३८ धावांची बरोबरी केली. त्यानंतर शाकिबने एक धाव घेत केकेआरचा विजय आणि आरसीबीची घरवापसी निश्चित केली.

चांगल्या सुरुवातीनंतर आरसीबी ढेपाळली ( RCB vs KKR )

तत्पूर्वी, आयपीएल २०२१ एलिमनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासमोर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे ( RCB vs KKR ) आव्हान असणार आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

आरसीबीने पॉवर प्लेचा चांगला उपयोग करत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने पहिल्यांदा  केकेआरच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. त्यानंतर देवदत्त पडिक्कलनेही आपला गिअर बदलला. मात्र लोकी फर्ग्युसनने १८ चेंडूत २१ धावा करणाऱ्या देवदत्त पडिक्कलचा पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर त्रिफळा उडवत आरसीबीला पहिला धक्का दिला.

नारायणच्या फिरकीने आरसीबीला धक्के ( RCB vs KKR )

पडिक्कल बाद झाल्यानंतर आलेल्या श्रीकर भरतने सावध सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने विराटनेही एकेरी आणि दुहेरी धावा घेण्यावर भर दिला. दरम्यान, भरतने धावांची गती वाढवण्यासाठी सुनिल नारायणला मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. मात्र भरतचा हा प्रयत्न फसला. तो १६ चेंडूत ९ धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

आरसीबीने २ विकेट्सच्या मोबदल्यात १० षटकात ७० धावांपर्यंत मजल मारली. विराटच्या साथीला आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने आक्रमक सुरुवात केली. मात्र सुनिल नारायणने ३३ चेंडूत ३९ धावा करणाऱ्या विराटचा त्रिफळा उडवला आणि आरसीबीला तिसरा आणि मोठा धक्का दिला.

आरसीबीचे रथी – महारथी स्वस्तात माघारी

विराट बाद झाल्यानंतर मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सने आरसीबीचे शतक धावफलकावर लावले. मात्र नारायणच्या फिरकीत डिव्हिलियर्स फसला आणि ११ धावांवर त्रिफळाचीत झाला. नारायण इथपर्यंतच थांबला नाही. त्याने आपल्या अखेरच्या षटकात आक्रमक मॅक्सवेलला १५ धावांवर बाद करत आरसीबीला अडचणीत टाकले.

पाठोपाठ विकेट पडल्याने आरसीबीची धावगती मंदावली. दरम्यान, ख्रिस्तियन आणि शाहबाज अहमद यांनी धावगती वाढवण्यास सुरुवात केली. मात्र लोकी फर्ग्युसनने शाहबाजला १३ धावांवर बाद करत आरसीबीला सहावा धक्का दिला. यानंतर आरसीबीकडे एकच षटक शिल्लक होते. या अखेरच्या षटकात शिवम मावीने १२ धावा दिल्यामुळे आरसीबी २० षटकात ७ बाद १३८ धावांपर्यंत पोहचली.

Back to top button