Bangalore vs Delhi : श्रीकार भारतच्या षटकाराने साकारला आरसीबीचा विजय | पुढारी

Bangalore vs Delhi : श्रीकार भारतच्या षटकाराने साकारला आरसीबीचा विजय

दुबई : पुढारी ऑनलाईन

दिल्ली कॅपिटल्सच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरच्या श्रीकार भारतने ( Bangalore vs Delhi ) अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत सामना जिंकून दिला. त्याने ५२ चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी करत विजयात मोठा वाटा उचलला, त्याला ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५१ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली.

दिल्ली कॅपिटल्सच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरची ( Bangalore vs Delhi ) सुरुवात खराब झाली. आरसीबीचे दोन्ही सलामीवीर १० धावांच्या आतच माघारी गेले. नॉर्खियाने देवदत्त पडिक्कलला पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता माघारी धाडले. त्यानंतर नॉर्खियाने पुढच्याच षटकात विराट कोहलीला ४ धावांवर बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला.

त्यानंतर आलेल्या श्रीकार भारत आणि एबी डिव्हिलियर्सने आरसीबीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने डिव्हिलियर्सला २६ धावांवर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला. डिव्हिलियर्स बाद झाल्यानंतर श्रीकार आणि ग्लेन मॅक्सवेलने चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली.

या दोघांनी आक्रमक फलंदाजी करत आरसीबीची धावगती झपाट्याने वाढवली. दरम्यान श्रीकारने आपले अर्धशतक पूर्ण केले.  या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १११ धावांची दमदार भागीदारी रचत सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला.  आक्रमक शैलीच्या मॅक्सवेलनेही शेवटच्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले.

अखेरच्या षटकात १५ धावांची गरज असताना या दोघांनी १ चेंडूत ६ धावा असा सामना आणला. त्यानंतर आवेश खानने अखेरचा चेंडू वाईड टाकला. त्यानंतर पुढचा चेंडू फूलटॉस टाकून श्रीकारला आयते कोलित दिले. श्रीकारनेही त्यावर षटकार ठोकत सामना जिंकून दिला. श्रीकारने ५२ चेंडूत नाबाद ७८ धावा केल्या तर त्याला साथ देणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने ३३ चेंडूत ५१ धावांची आक्रमक खेळी केली.

तत्पूर्वी,  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर ( Bangalore vs Delhi ) यांच्यातील सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली.

या दोघांनी दिल्लीला १० षटकात ८८ धावांपर्यंत पोहचवले. मात्र ही जोडी फॉर्ममध्ये असलेल्या हर्षल पटेलने तोडली. त्याने शिखर धवनला ४३ धावांवर बाद केले.  शिखर बाद झाल्यानंतर पुढच्याच षटकात पृथ्वी शॉ देखील ४८ धावांवर माघारी फिरला. त्याला यझुवेंद्र चहलने बाद केले.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि शिमरॉन हेटमायरने दिल्लीचे शतक धावफलकावर लावले. या दोघांनी १५ व्या षटकापर्यंत दिल्लीला १२८ धावांपर्यंत पोहचवले. ही जोडी १५० धावांची भागीदारी करण्याच्या दिशेने कूच करत असताना मोहम्मद सिराजने १८ धावांवर खेळणाऱ्या श्रेयस अय्यरला बाद केले.

अय्यर बाद झाल्यानंतर हेटमायरने आक्रमक फलंदाजी करत दिल्लीचे दीडशतक धावफलकावर लावले. त्याने २२ चेंडूत २९ धावांची खेळी करत दिल्लीला २० षटकात ५ बाद १६४ धावांपर्यंत पोहचवले.

Back to top button