INDvSL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋषभ पंतला डच्चू, शिखर धवनला बसवले कट्ट्यावर | पुढारी

INDvSL : श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋषभ पंतला डच्चू, शिखर धवनला बसवले कट्ट्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. तर सूर्यकुमार यादवला उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यानच्या वनडेची कमान रोहितकडेच राहील. रोहित आणि विराट कोहलीला T20 मधून विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, हे दोघेही वनडे संघाचा भाग असतील. शिखर धवन आणि ऋषभ पंत यांना संघात स्थान मिळालेले नाही.

धवनच्या जागी शुभमन गिलला प्राधान्य देण्यात आले असून तो रोहितसोबत ओपनिंग करताना दिसेल अशी शक्यता आहे. मात्र टीममध्ये केएल राहुलही आहे, त्यामुळे ओपनिंगसाठी कोण येणार याबाबत सस्पेंस आहे. तर यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवत त्याच्या ऐवजी ईशान किशनला स्थान देण्यात आले आहे. ईशानने नुकतेच बांगलादेश दौऱ्यावर वनडेत द्विशतक झळकावून लक्षवेधी कामगिरी केली होती.

पंतचे खराब प्रदर्शन

गेल्या एका वर्षातील पंतच्या खेळावर नजर टाकली तर त्याला भारताकडून 13 टी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून केवळ 213 धावा आल्या, ज्यामध्ये एकाही अर्धशतकाचा समावेश नव्हता. पंत इतकी गेल्या वर्षभरात टीम इंडियाकडून सतत खेळण्याची संधी क्वचितच कोणत्याही युवा क्रिकेटपटूला मिळाली असेल.

त्याच वेळी, एकदिवसीय फॉर्मेटमध्ये पंतने भारतासाठी 12 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 37.33 च्या सरासरीने 336 धावा केल्या. यादरम्यान तो निष्काळजीपणे फटके खेळून स्वत:ची विकेट गमावत असल्याचे अनेकदा दिसून आले.

दरम्यान, गुडघ्याच्या दुखापतीमुळे पंतला संघातून वगळण्यात आल्याचे मानले जात होते, परंतु पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दुखापतीमुळे नव्हे तर सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

धवन शुभमनसमोर फिका पडला

शिखर धवनने आपल्या दमदार खेळाने भारताला अनेक वेळा सामने जिंकून दिले आहेत यात शंका नाही पण त्याचा अलीकडचा फॉर्म पाहता तो शुभमन गिलच्या ताज्या दमाच्या फलंदाजीपुढे फिका दिसत आहे. या वर्षी भारताकडून धवन एकमेव खेळाडू होता ज्याला श्रीलंका आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर कर्णधार बनवण्यात आले होते. यासोबतच 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी तो संभाव्य संघात दिसत होता, पण शुभमन गिलच्या कामगिरीसमोर त्याची चमक फिकी पडली.

धवनने यावर्षी टीम इंडियासाठी एकूण 22 एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये तो केवळ 688 धावा करू शकला. यामध्ये त्याच्या खात्यात एकही शतक आले नाही.

त्याच वेळी, जेव्हा शुभमन गिलला भारताकडून एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने आपल्या बॅटने चमत्कार केले. शुभमनला यावर्षी केवळ 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्याने 70.88 च्या प्रभावी सरासरीने 638 धावा केल्या, ज्यात एका शतकाचा समावेश आहे.

अशा परिस्थितीत गिलची तुलना धवनशी केली तर तो गीलची बाजू सरस दिसत आहे. त्याचबरोबर हा गिल युवा फलंदाज असून तो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आगामी मोठ्या स्पर्धा लक्षात घेऊन संघ व्यवस्थापन त्याला जास्तीत जास्त संधी देइल यात शंका नाही.

शिवम मावीला संधी

शिवम मावीला टी-20 संघात संधी देण्यात आली आहे. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार गोलंदाजी केली आहे. गेल्या 5 सामन्यात त्याने 19 बळी घेतले आहेत. यामध्ये दोन रणजी आणि तीन लिस्ट ए सामन्यांचा समावेश आहे.

मोहम्मद शमीचे पुनरागमन

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. तो बांगलादेशविरुद्धच्या संघाचा भाग होता पण नेट सत्रादरम्यान तो जखमी झाला होता.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

T20I मालिकेसाठी टीम इंडिया

हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.

Back to top button