Virat Kohli Birthday Special : प्रेरणादायी विश्वविराटरूपम…

Virat Kohli Birthday Special
Virat Kohli Birthday Special

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतला आहे. जवळपास तीन वर्षे तो अपयशाची जखम घेऊन वावरत होता. मनासारखे काहीच घडत नव्हते. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.

दोन महिन्यांपूर्वी तो अपयशाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी अभिमन्यूप्रमाणे प्रयत्न करीत होता. नोव्हेंबर 2019 मध्ये कारकिर्दीतील 70वे शतक झळकल्यानंतर पावणेतीन वर्षांचा काळ लोटला. लढवय्या फलंदाज म्हणूनही त्याची उपयुक्तता संपुष्टात येत चालली होती. धावांसाठी झगडताना आढळत असल्याने त्याचे संघातील स्थान धोक्यात आले होते. तो संपला, अशी ओरड क्रिकेट जाणकार आणि चाहत्यांकडून होऊ लागलेली. कारकिर्दीचा उंचावलेला आलेख घसरत जाऊन त्यापुढे पूर्णविराम दिला जाणार, अशीच चिन्हे दिसत होती… पण तो खचला नाही! आपल्या समर्थ इच्छाशक्तीच्या बळावर पुन्हा पाय रोवून उभा राहिला. आशिया चषक स्पर्धेत त्याला सूर गवसला. अफगाणिस्तानविरुद्ध शतकाची प्रतीक्षाही संपुष्टात आणली. ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताच्या सलामीच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत क्रिकेट जगताने प्रेरणादायी 'विश्वविराटरूपम' अनुभवले…

भारताची 4 बाद 31 अशी स्थिती असतानाही विजयाच्या आशा कायम टिकवत अखेरीस ऐतिहासिक विजय मिळवून देणारा विराट कोहली पुन्हा त्याच्या मूळ भूमिकेत परतला आहे. गेली जवळपास तीन वर्षे तो अपयशाची जखम घेऊन वावरत होता. ती बरी होत नव्हती. मनासारखे काहीच घडत नव्हते. पण या खेळीनंतर त्या जखमेचा मागमूसही राहिला नव्हता. राखेतून पुन्हा उभ्या राहणार्‍या फिनिक्सप्रमाणे विराटची ही यशोगाथा झाली.

आशिया चषकाआधी एका पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, दहा वर्षांत पहिल्यांदाच मी माझ्या बॅटला महिनाभर हात लावलेला नाही. इच्छाशक्ती प्रबळ असल्याचे मी स्वतःलाच सांगत होतो. पण माझे शरीर मला थांबण्याचे संकेत देत होते. काही काळ थांब आणि विश्रांती घे, असे माझे मन मला सांगत होते. या कठीण काळातून जात असताना माजी कर्णधार कपिल देव यांनी कोहलीच्या कामगिरीवर शरसंधान साधले होते. 'जर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कसोटी संघातून वगळता येत असेल, तर ट्वेन्टी-20 मधील अग्रस्थानावरील फलंदाजालाही वगळले पाहिजे.' अशा शब्दांत कपिल यांनी ताशेरे ओढले होते. पण या टीकेने विराट खचला नाही.

गतवर्षी संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील भारताच्या कामगिरीची जबाबदारी घेत विराटने फलंदाजीकडे अधिक लक्ष केंद्रित करता यावे म्हणून कर्णधारपद सोडले. परंतु, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मर्यादित षटकांच्या दोन्ही प्रकारांसाठी एकच कर्णधार असावा म्हणून एकदिवसीय कर्णधारपदसुद्धा त्याच्याकडून काढून रोहित शर्माकडे सोपवले. मग चालू वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-2 अशी भारताने हार पत्करल्यामुळे विराटने कसोटीचे कर्णधारपदसुद्धा सोडले. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपद सोडणार्‍या कोहलीचा फलंदाजीचा सूरही हरवला. गेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील अपयशानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी बरेच प्रयोग केले. या प्रकारात 30 खेळाडू त्यांनी आजमावले. नवे पर्याय उपलब्ध झाल्यामुळे ऑस्ट्रेलियात होणार्‍या ट्वेन्टी-20 विश्वचषकासाठी कोहलीच्या निवडीबाबत शंका निर्माण झाली. पण या 'शंका'सुराचा वध विराटने केला.

आयुष्यातील सर्वात कठीण कालखंडातून जातानाच माणसाची खरी ओळख पटते, तर सर्वात आव्हानात्मक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळतानाच खेळाडूचा दर्जा खर्‍या अर्थाने सिद्ध होतो. 2016 च्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सर्वात आव्हानात्मक लढतीनंतर विराटकडे पाहण्याचा क्रिकेट जगताचा द़ृष्टिकोनच बदलला. जणू सचिनचा वारसदार गवसल्याचाच आनंद भारतीय क्रिकेटला झाला. काही वर्षांपूर्वीच भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ही ग्वाही दिली होती. सचिनचे जागतिक क्रिकेटमधील विश्वविक्रम एखादा भारतीयच मोडेल आणि तो विराटच असेल, अशा प्रकारे भविष्यवाणी गावस्कर यांनी केली होती.

विराटचे वडील प्रेम कोहली यांना आपल्या मुलांनी क्रिकेटपटू व्हावे, असेच स्वप्न पाहिले होते. मे 1997 मध्ये प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिल्लीच्या पश्चिम विहार भागात नवी अकादमी काढली. तेव्हा विराटच्या वडिलांनी पाच वर्षीय विकास आणि आठ वर्षीय विराट यांना या अकादमीत दाखल केले. काही महिन्यांनी जेव्हा शर्मा वडिलांना भेटले, तेव्हा ते म्हणाले, 'तुमचा छोटा मुलगा विकास छान खेळतो…' पण काही महिन्यांतच विकासने अकादमीला अलविदा केला. पण विराटचा खेळ मात्र नजर लागण्यागत बहरत गेला… तो आजमितीपर्यंत.

1999 च्या विश्वचषकादरम्यान सचिनच्या वडिलांचे निधन झाले. पण अंत्यविधीसाठी मुंबईत येऊन गेल्यानंतर सचिनने पुन्हा इंग्लंडला जाऊन विश्वचषकात आपला करिष्मा दाखवला आणि ती शतकी खेळी वडिलांना अर्पण केली होती. तसाच एक प्रसंग विराटच्या जीवनात घडला. 2006-07 ला रणजी क्रिकेट हंगामामध्ये दिल्लीचा संघ अडचणीत असताना रात्री वडिलांचे निधन झाले. कुटुंबावर जणू आभाळच कोसळले होते. परंतु, सकाळी धीरोदात्तपणे विराटने प्रशिक्षक राजकुमार यांना दूरध्वनी केला आणि ठामपणे संघाला गरज असल्यामुळे मी मैदानावर जाऊन अर्धवट राहिलेली नाबाद खेळी पूर्ण करणार, असे सांगितले. वडिलांचा मृत्यू हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग. मनाने खंबीर माणसेही यावेळी खचून जातात. पण हा खचला नाही, तर आपली क्रिकेटवरील निस्सीम भक्ती आणि बांधिलकी जपत आपल्याकडे करुणा भाकतो आहे. शर्मा यांनी मनोमनी विराटला 'हॅट्स ऑफ' केले. विराट शब्दाला जागला. संघाला सावरल्यानंतरच तो घरी परतला. प्रतिस्पर्धी कर्नाटकच्या संघालाही त्याच्या या मनसामर्थ्याचे अप्रूप वाटले.

त्यानंतर विराटने मजल-दरमजल करीत भारतीय युवा संघात स्थान मिळवले. विराटच्याच नेतृत्वाखाली भारताने 2008 मध्ये युवा विश्वचषकाला गवसणी घातली. मग अब्जावधी क्रिकेट रसिकांच्या आशा-आकांक्षांचे ओझे असलेल्या भारतीय संघात विराटने आपले स्थान निर्माण केले. विराटचे सध्याचे दिवस हे त्याच्या गेल्या 16 वर्षांतील मेहनतीचे फळ आहे. एका रात्रीत हे मुळीच घडलेले नाही. एक काळ असा होता की, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग बाद झाल्यावर सामना पाहण्याचे कवित्वच हरपून जायचे. नैराश्याच्या भरात टीव्ही बंद केले जायचे, काही क्रिकेटचाहते तर चक्क मैदान सोडायचे. सचिनचा हा कित्ता गिरवण्याचे कार्य सध्या विराट करतो आहे.

विराटच्या आयुष्यात क्रिकेट म्हणजेच सर्वकाही आहे. सकाळी बिछान्यातून उठल्यापासून रात्री पुन्हा डोळे मिटेपर्यंत क्रिकेट हा एक प्राणवायू त्याला जगण्याची प्रेरणा देतो. 'आक्रमकता म्हणजे सकारात्मकता' हे त्याचे ब्रीदवाक्य. मैदानावर याच आक्रमकतेच्या वेगवेगळ्या रूपांमध्ये विराट दिसतो. त्यामुळेच त्याचे मैदानावरील आणि बाहेरील अनेक पंगे त्याला 'सभ्य गृहस्थांचा खेळ' असे बिरुद मिरवणार्‍या खेळामधील आदर्श क्रिकेटपासून थोडेसे दूर नेतात. ऑस्ट्रेलियामधील चाहत्यांशी अशाच प्रकारे त्याचा वाद झाला होता आणि त्याने प्रेक्षकांना उद्देशून मधले बोट दाखवले होते. याबद्दल त्याला शिक्षाही झाली होती.

ऐंशीच्या दशकात 'ये बेचारा काम के बोझ का मारा, इसे चाहिए सिंकारा…' अशी एक जावेद जाफ्रीची जाहिरात लोकप्रिय झाली होती. सकारात्मकतेची ऊर्जा त्या जाहिरातीत होती. पण विराटच्या यशाची ऊर्जा ही स्वयंप्रेरणेची आहे. कधीही हार न मानण्याची वृत्ती हे विराटच्या यशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तो हिंमत न हरता अखेरच्या चेंडूपर्यंत लढतो. तो सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत, आघाडी सांभाळतो. आपली सकारात्मकता तो कायम ठेवतो.

मानवी आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमधील प्रवास. सुख आणि दु:ख या एकाच नाण्याच्या दोन अपरिहार्य बाजू. 'शोले' चित्रपटातील अमिताभ बच्चनकडे असलेल्या नाण्याप्रमाणे दुहेरी छापा असलेले नाणे आयुष्यात नसते. कोरोनाच्या कालखंडानंतर तर जगण्याच्या व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. अनेकांच्या वाट्याला कठीण परिस्थिती आली. अगदी महाभारत युद्धाआधी महारथी अर्जुनही निराश, हताश, निष्क्रिय झाला होता. समोर युद्धासाठी उभे असलेले आपले नातलग आहेत. त्यांच्याविरुद्ध मी कसे लढणार? युद्ध नको, या भूमिकेपर्यंत आलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने गीता ऐकवली आणि युद्धासाठी सज्ज केले आणि पुढे त्याने ते गाजवले. अपयशावर मात करण्यासाठी बळ देणारा हा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो. पण विराटने अपयशावर मात करण्याची दीक्षा आपल्याला दिली आहे. लेखक व. पु. काळे म्हणतात, 'आकाशाकडे पाहायचे, ते आकाश होऊन पाहावे म्हणजे ते जवळचे वाटते. 'विराट' या शब्दाचा अर्थ तेव्हा समजतो.'

प्रशांत केणी

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news