ज्येष्ठ क्रिकेटपटू बापू नाडकर्णींचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई : क्रीडा प्रतिनिधी

भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्र्चात पत्नी, मुलगी, जावई व नातू असा परिवार आहे. गेली काही वर्षे बापू नाडकर्णी हे पवई येथील मुलीच्या घरी राहत होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. सकाळी ११ वाजता दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती नाडकर्णींचे जावई विजय खरे यांनी दै.पुढारीशी बोलताना सांगितले.

बापू नाडकर्णी यांचा जन्म ४ एप्रिल १९३३ साली नाशिक येथे झाला. बापू यांचे नाव रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे होते. पण, क्रिकेटविश्‍वात त्यांना बापू नाडकर्णी याच नावाने ओळ्खले गेले. त्यांनी खेळलेल्या ४१ कसोटी सामन्यांमध्ये  २५.७० च्या सरासरीने एक शतक व सात अर्धशतकांसह १४१४ धावा केल्या. तर, गोलंदाजीमध्ये त्यांनी २९.०७ च्या सरासरीने ८८ विकेट्स आपल्या नावे केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी १९१ सामन्यांमध्ये ४०.३६ च्या सरासरीने ८८८० धावा केल्या असून त्यामध्ये १४ शतक व ४६ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, २१.३७ च्या सरासरीने ५०० विकेट्स मिळवल्या आहेत.

अष्टपैलू खेळाडू अशी ख्याती असलेले नाडकर्णी आपल्या गोलंदाजीवर कमी धावा देत असत. नाडकर्णींचा विक्रम आजही अबाधित आहे. १२ जानेवारी १९६४ ला एकाच डावात सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विक्रम नाडकर्णींच्या नावावर आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या या लढतीत आपल्या डावखु-या फिरकी गोलंदाजीने त्यांनी पाहुण्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले. हा सामना अनिर्णित राहिला पण, पाच दशक उलटूनही नाडकर्णींचा हा विक्रम मोडता आला नाही.

भारतीय क्रिकेटचे एक युग संपले : उद्धव ठाकरे

बापू नाडकर्णींच्या निधनाने भारतीय क्रिकेटचे एक युग संपले. अशी भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. अचूक मारा करणारा गोलंदाज अशी त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटचे स्नेही होते. अनेकदा ते मातोश्रीवर येत. गप्पांची मैफील जमत असे. बाळासाहेबांबरोबर रेल्वे प्रवास करणारी जी टीम होती. त्यात बापू होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news