फुलराणी आता राजकारणाच्या कोर्टवर; भाजपमध्ये केला प्रवेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बुधवारी ​भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंग यांनी पक्ष मुख्यालयात सायनाला पक्षाचे सदस्यत्व दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे प्रेरणा मिळते,अशी भावना यावेळी सायनाने व्यक्त केली. सायनासह तिची ​बहिण चंद्राशुने देखील भाजपमध्ये प्रवेश केला. मुळची हरियाणातील हिसारची रहिवासी असलेली सायना दिल्लीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करतांना दिसून येईल, अशी शक्यता त्यामुळे वर्तवली जात आहे. 

दिल्ली प्रचाराच्या रणधुमाळीत सायना भाजपसाठी स्टार प्रचारक ठरेल, अशी चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचे (सीएए) सायनाने जाहीर समर्थन केले होते. जागतिक दर्जाची बॅडमिंटनपटू सायनाचा दिल्लीसह देशात सीएए विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाची धग शांत करण्यासाठी पुढे करण्याचा मानस भाजपचा असल्याचे त्यामुळे बोलले जात आहे. 

बॅडमिंटनमधील उत्कृष्ठ खेळाबद्दल सायनाला राजीव गांधी खेल रत्न,अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने आतापर्यंत २४ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयश्री मिळवला आहे. २०१५ मध्ये बॅडमिंटनपटूंच्या जागतिक क्रमवारीत ती पहिल्या क्रमांकावर होती. लहानपणापासून हैद्राबादमध्ये राहून तिने बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले आहे. 

यापूर्वीही अनेक खेळाडूंनी भाजपमध्ये प्रवेश करीत त्यांचे राजकीय भवितव्य आजमावने आहे. योगेश्वर दत्ती, बबिता फोगाट यांनी हरियाणा विधानसभा निवडणुक, तर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने लोकसभा निवडणूक लढवली होती. सायनाच्या भाजप प्रवेशामुळे येत्याकाळात ती निवडणूक लढवतांना दिसून येईल, अशी भाकिते वर्तवली जात आहे. जगभरातील उत्कृष्ठ बॅडमिंटनपटूं​च्या यादीत सायनाचा समावेश केला जातो. जागतिक क्रमवारीत सध्या ती आठव्या क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news